लोकसत्ता टीम

नागपूर : दोन वर्षाच्या प्रेम प्रकरणानंतर युवक आणि युवतीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. दोघांचाही सुरळीत संसार सुरू झाला. मात्र पत्नीचे कुण्यातरी युवकाशी अनैतिक संबंध आहेत, असा संशय पतीला होता. याच वादातून पतीने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केला.

ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. राखी उर्फ पूनम पाटील (२७) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून सूरज पाटील असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सूरज आणि राखीने तुळजाईनगरात भाड्याने खोली घेतली होती. सूरज पेंटींगचे काम करतो. त्यांना पाच आणि तीन वर्षाच्या दोन मुली आहेत.

आणखी वाचा-महिला वकिलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार… न्यायाधीश असलेला सासराही…

गुरूवार ९ जानेवारीला दुपारच्या सुमारास पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याच्या कारणातून दोघांमध्ये वाद झाला. रागात सूरजने राखीला डोक्यात मारले. व तिचे डोके भिंतीवर मारले. त्यामुळे राखी रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. घरात रक्ताचा सडा पडला. पाहता पाहता राखी बेशुध्द झाली. दुपारी ३ वाजताच्या सुमारास सूरज राखीला मेडिकल रुग्णालयात घेऊन गेला. डॉक्टरांनी राखीला मृत घोषित केले. पत्नी इमारतीवरून खाली पडल्याने डोक्याला जबर लागल्याचे सूरजने डॉक्टरांना सांगितले.

राखीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला. मेडिकल पोलिस बूथकडून हुडकेश्वर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी एक पथक रुग्णालयात तर दुसरे पथक घटनास्थळी रवाना केले. खोलीत जाताच पोलिसांना घरात रक्ताचा सडा दिसला. डॉक्टरांना दिलेली माहिती आणि घटनास्थळाचे दृष्य विरोधाभासी होते.

आणखी वाचा-रक्षणकर्ता भाऊ मनोरुग्ण बहिणीला बेवारस सोडून पळाला… नंददीप फाऊंडेशनने मात्र…

ठाणेदारांनी लढविली कल्पकता

घटनेनंतर सूरज दोन्ही मुलींना घेऊन फरार झाला. घरमालकासह जवळपासच्या लोकांनाही त्याच्याबाबत माहिती नव्हती. पोलिसांनी पाहणी केली असता घरात रक्ताचा सडा पडून होता. ठाणेदार भेदोडकर यांनी सूरजला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलीस अंमलदाराच्या माध्यमातून त्याला फोन केला. मेडीकलच्या कागदपत्रावर तुझी स्वाक्षरी पाहिजे. हे कागदपत्र भविष्यासाठी महत्वाचे आहे. स्वाक्षरी करून कागदपत्र घेऊन जा. असे सांगताच सूरज रूग्णालयात पोहोचला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली. त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.

Story img Loader