अकोला : एका विवाहितेचे दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम जडले. दोघांनाही लग्न करायचे होते मात्र पतीचा अडथळा होता. त्यामुळे प्रियकराने विवाहितेच्या पतीला धमकी देऊन ‘तू फारकत दे मला तुझ्या पत्नीशी लग्न करायचा आहे’ असे म्हणत त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून पतीने धक्कादायक पाऊल उचलले. अनैतिक संबंधातून पतीने पत्नीची हत्या करून स्वतः ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाशीम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील पिंपरी खरबी येथे गुरुवारी घडली.
ज्योती गौतम वर (वय ४५) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे, तर गौतम नारायण वर (४८) असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पती-पत्नीचे नाते पवित्र असते. त्यामध्ये तिसरा व्यक्ती आल्यास अनर्थ घडतो. अनैतिक संबंधाचा शेवट हा वाईटच होतो, हे अनेक घटनांवरून समोर आले आहे. याच प्रकारची एक धक्कादायक व खळबळजनक घटना वाशीम जिल्ह्यात घडली.
अनैतिक संबंधातून पती-पत्नीचा दुर्दैवी अंत झाला तर प्रियकर गजाआड गेला आहे. या प्रकरणी मृतक ज्योती वर आणि नारायण वर यांच्या मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, तक्रारदाराची आई ज्योती वर व संजय ठोके (वय ५०, रा. लावणा ह. मु. नवीन सोनखास मंगरूळपीर) यांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे आरोपी संजय ठोके हा गौतम नारायण वर (४८) यांना जीवाने मारून टाकण्याची धमकी देत होता.
‘तू ज्योतीला फारकत दे, मला तिच्याशी लग्न करायचे आहे,’ असे तो वारंवार म्हणून गौतम वर यांना त्रास देत होता. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास पिंप्री खरबी येथील राहत्या घरी गौतम नारायण वर यांनी फिर्यादीची आई ज्योती गौतम वर हिला धारदार विळ्याने व लोखडी रॉडने डोक्यात मारून जखमी करीत जिवे मारले व घराजवळच असलेल्या शंकर ठाकरे यांच्या शेतामधील टीनपत्र्याच्या शेडला नॉयलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. संजय लक्ष्मण ठोके याने वडिलांना आईला मारून टाकण्यासाठी भाग पाडले व नंतर त्यांनी आत्महत्या केली, अशी तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.