शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १७ मार्चला एका बाळंतीण महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मुलगी झाली म्हणून सासरच्यांनी मानसिक छळ केला. त्यामुळे १५ दिवसांच्या तान्हुलीला सोडून आईने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. अखेर या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी पती, सासू व नणंद विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >>> नागपूर : ‘सकाळचा भोंगा’ बंद करा! बावनकुळेंनी राऊताना पुन्हा डिवचले
गोदावरी राजेश खिल्लारे यांना मुलगी झाल्याने पती, सासू व नणंदेने टोमणे मारून शिवीगाळ केली. अगोदरच पतीसह सासूने ‘तुला मुलगी झाली तर आम्हाला तोंडही दाखवू नको आणि घरात सुद्धा येऊ नको’ अशा शब्दात सुनावले होते. त्यानंतर २ मार्चला महिलेला मुलगी झाली. ही मुलगी माझ्या मुलाची नाही, असे म्हणत, विवाहितेचा सासूने छळ केल्याचा आरोप आहे. याच कारणावरुन गोदावरीने रुग्णालयात गळफास लाऊन आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला. मृत विवाहितेचा भाऊ महादेव गणपत भोंगळ (वय, ३० रा.मालेगाव, जि. वाशीम) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पती नंदकुमार नारायण खिल्लारे, सासू कस्तुराबाई नारायण खिल्लारे, नणंद सोनू विट्ठल वैरागळे तिचा नेहमी छळ करीत होते. पती दारू पिऊन मारहाण करीत होता. गोदावरीने पती, सासू व नणंदेने छळ केल्यानेच त्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी भावाच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी पती, सासू व नणंद विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.