लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : छत्तीसगडच्या एका गावात पती- पत्नी, तीन मुलींसह मोठे कुटुंब आनंदाने राहत होते. कुटुंबात शुल्लक वाद झाल्याने पतीने रागाच्या भरात घर सोडले. अनेक वर्षे शोधाशोधानंतरही पती सापडला नाही. रस्त्यावर बेघर सदृष्य राहणाऱ्या पतीचे हाड मोडल्यावर त्याला नागपुरातील मेडिकल रुग्णालयात दाखल केले गेले. पैसे नसल्याने समाजसेवा अधिक्षक विभागाने उपचाराला मदत करून विचारणा केल्यावर हा प्रकार पुढे आला. कुटुंबाला माहिती मिळाल्यावर त्यांनी नागपूर गाठत पतीला सोबत नेले.

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील समाजसेवा अधिक्षक कार्यालयाच्या माहितीनुसार, एक अनोळखी व्यक्ती ९ जुलै २०२४ रोजी नागपुरातील मेडिकल रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक १ मध्ये दाखल झाला. अस्थीरोग विभागातील या वार्डात तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याच्या हाताचे हाड मोडले होते. रुग्णाला रस्त्यावर पडल्याने काही जखमाही झाल्या होत्या. रुग्णावर उपचार सुरू करत रुग्णाकडे पैसे नसल्याने तेथून रुग्णाबाबतची माहिती समाजसेवा विभागाला दिली गेली.

आणखी वाचा-इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये पाणी शोधणारी यंत्रणाच नाही! पेट्रोल पंप चालकांची संघटना म्हणते…

दरम्यान या वार्डाची जबाबदारी असलेले समाजसेवा अधीक्षक विक्रम लांजेवार यांनी रुग्णाच्या उपचारासाठीच्या सर्व औषधोपचारासह साहित्यासाठी मदत केली. दुसरीकडे रुग्णाला विश्वासात घेऊन त्याच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरू झाले. सुरवातीला रुग्णाशी संवाद साधतांना त्याला व्यवस्थित बोलण्यात अडचण येत असतांनाच हिंदी येत नव्हते. दुसरीकडे तो छत्तीसगडी भाषेत बोलत असल्याने बरेच शब्द लांजेवार यांनाही कळत नव्हते. दोन दिवस रुग्णाने कुटुंबाबाबत माहिती दिली नाही. परंतु हळू- हळू लांजेवार यांच्याशी रुग्ण तुटक- फुटक बोलू लागला. त्यात त्याने स्वत:चे नाव जितेंद्र लच्चीराम ध्रुव असून छत्तीसगडचा असल्याचे सांगितले. एकदा त्याच्या तोंडून करणकापा ता. लोरमी निघाले. त्यावरून समाजसेवा विभागाकडून छत्तीसगडच्या संबंधित पोलीस ठाण्याचा पत्ता काढून तेथील अधिकारी- कर्मचाऱ्यांना रुग्णाबाबत माहिती दिली गेली. त्याच्या कुटुंबियाबाबत माहिती काढण्याची विनंती केली असता त्यांनी संबंधित गावात विचारपूस केली. त्यात या रुग्णाच्या पत्नीसह इतर कुटुंबाबाबत पोलिसांना कळले.

पोलिसांनी सदर रुग्णाबाबत माहिती देताच रुग्णाच्या पत्नी, शेजारील एक व्यक्तीसह काही नातेवाईक तातडीने नागपुरातील मेडिकल रुग्णालयात पोहचले. पत्नी रुग्णाच्या पुढे आल्यावर सुरुवातीला पतीने तब्बल वीस वर्षांनी तिला बघितल्यावर ओळखले नाही. परंतु पत्नीला अश्रू अनावर झाले. त्यानंतर तिने पतीकडे जाऊन दोन शब्द उच्चारताच दोघांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यानंतर पत्नीसोबत असलेल्या इतरही कुटुंबियांनी रुग्णाशी संवाद साधला. हा अनोखा प्रकार बघून वार्डातील डॉक्टर, परिचारिकांसह तेथील प्रत्येक रुग्ण- नातेवाईकांकडून मेडिकलच्या समाजसेवा विभागाचे कौतुक केले जात होते. या उपक्रमासाठी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांचीही भूमिका महत्वाची होती.

आणखी वाचा-शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘हे’ अॅप कामकाजात वापरणे अनिवार्य; सुरक्षा प्रथम म्हणून हा उपाय…

नागपुरातील चहाच्या टपरीवर काम करून रस्त्यावर झोपायचा

समाजसेवा विभागाने रुग्णाबाबत माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला पंचशील चौकातील एका चहा टपरीवाल्याने दाखल केल्याचे पुढे आले. या टपरीवर तो गेल्या अनेक वर्षांपासून दिवसभर काम करून रस्त्यावर झोपत असल्याचे पुढे आले. दरम्यान त्याची प्रकृती खराब झाल्यावर या टपरी चालकानेच त्याला माणूसकी म्हणून मेडिकलमध्ये दाखल केले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man left home due to little dispute with family meeting family after 20 years after broken bone mnb 82 mrj