अमरावती: कुटुंबीयांच्या टोकाच्या विरोधामुळे आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना धमक्या, सामाजिक बहिष्कार ते जीवघेण्या हल्ल्यापर्यंतच्या संकटांना तोंड द्यावे लागते. विवाहानंतर अनेक दाम्पत्यांना सामाजिक बहिष्कारालाही सामोरे जावे लागते. पण, अशाच एका घटनेत मेहुणा सतत विरोध करून त्रास देत असल्याने त्याला कंटाळून जावयानेच मेहुण्याची हत्या केल्याची घटना अमरावतीत उघडकीस आली आहे.

बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगल परिसरात बुधवारी २३ एप्रिलला एका तरुणाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले व त्यांच्या पथकाने शोध सुरू केला. संशयाच्या आधारे पोलिसांनी मृताच्या जावयासह दोघांना अटक केली. दरम्यान जावयानेच ही हत्या केल्याचे समोर आले. मृत तरुणाच्या बहिणीचा आंतरजातीय विवाह झाला असून, त्याचा या विवाहाला विरोध होता. याच कारणावरून मृत तरुण वारंवार वाद घालायचा, त्याच कारणातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

रोषण महेंद्रसिंग नाईक (३४, रा. तपोवन) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी रवी गंगाधर वानखडे (३५, रा. उदखेड पार्डी) आणि दिनेश बंडू कुऱ्हाडकर (२६, दोघेही रा. उदखेड पार्डी) यांना अटक केली आहे. रवी वानखडे हा रोशन नाईकचा जावई आहे. रवीने सुमारे दहा वर्षांपूर्वी रोशनच्या बहिणीसोबत आंतरजातीय विवाह केला आहे. तो विवाह रोशनला मान्य नव्हता. त्यामुळे रोशन त्याच्या घरात आई-वडिलांसोबत तसेच बहीण आणि जावयासोबतसुद्धा वारंवार वाद घालत होता. या वादाला कंटाळूनच रवी वानखडेने त्याचा मित्र दिनेश कुऱ्हाडकरच्या मदतीने रोशनचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

मंगळवारी २२ एप्रिलला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास रवी आणि दिनेश या दोघांनी रोशनला शहरातील चपराशी पुरा चौकात बोलावले, त्या ठिकाणावरून आपण बाहेर जाऊ, असे त्याला सांगितले. त्यानंतर या तिघांनी दारू घेतली. त्यानंतर बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगल भागात हे पोहोचले. त्या ठिकाणी ते तिघेही दारू पिलेत. त्यानंतर रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास रवीने सोबत आणलेल्या ब्लेडने रोशनचा गळा चिरला. रोशनचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच रवी आणि दिनेशने तिथून पळ काढला. दरम्यान बुधवारी सकाळी गळा चिरलेला मृतदेह काही नागरिकांना दिसताच त्यांनी बडनेरा पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी तपास सुरू केला आणि अखेर आरोपींना हुडकून काढण्यात त्यांना यश आले.