नागपूर: २० वर्षे संसार केल्यानंतरही पत्नीला मुलबाळ झाले नाही, त्यामुळे नैराश्यात गेलेल्या पतीने पत्नीचा दंड्याने डोके फोडून खून केला. दार बंद करून तिचा मृतदेह घरात झाकून ठेवला. माणुसकीला काळीमा फासणारी गंभीर घटना कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली. बाबुलाल वर्मा (४३) रा. विजयनगर, कळमना असे आरोपीचे नाव आहे.
बाबुलाल आणि पत्नी सबीरा वर्मा (४०) हे मूळचे छत्तीसगढ राज्यातील आहेत. काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात नागपुरात आले आणि इथेच स्थायिक झाले. बाबुलालच्या लग्नाला जवळपास २० वर्ष झालीत. मात्र, त्याला मुल नव्हते. याच कारणावरून तो पत्नीशी नेहमी भांडण करायचा. अलिकडे त्याचा अपघात झाल्याने तो दारु प्यायला लागला होता. मंगळवारी तो कामावर गेला नव्हता. दुपारच्या सुमारास त्याने अपत्य होत नसल्याच्या कारणावरून पत्नीशी भांडण केले. वाद विकोपाला जाताच त्याने दांड्याने तिच्या डोक्यावर प्रहार केला. ती रक्तबंबाळ स्थितीत खाली कोसळली. काही वेळातच तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाल्याचे बाबुलालच्या लक्षात आले. त्याने आतून दार बंद केले व तिच्या मृतदेहाजवळ सहा तास बसून होता.
हेही वाचा >>>चंद्रपूर,गोंदिया,वर्धा, यवतमाळसह राज्यात या शहरात सुरू होणार खाजगी एफ. एम. सेवा
घटना अशी उघड झाली
थानसिंग वर्मा (२४) हा आरोपीचा भाचा असून तो जवळच राहतो. त्याने मामाला फोन करून आत्याला फोन देण्यास सांगितले. ‘ तुझ्या आत्याचा मी आत्ताच खून केला’, असे त्याने सांगितले. यावर भाचा म्हणाला, ‘मामा गंमत करु नका. मला आत्याशी महत्वाचे काम आहे.’यावर ‘खरंच तुझ्या आत्याची हत्या केली.’ असे सांगितल्याने भाच्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने तडक आत्याचे घर गाठले.
पोलिसांना दिली माहिती
थानसिंग वर्मा हा धावपळ करीत रात्री ९ वाजताच्या सुमारास आत्याच्या घरी पोहोचला. मात्र, दार आतून बंद होते. दार ठोठावले, परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्याने खिडकीतून पाहिले असता घरात रक्ताचा सडा दिसला. ही बाब त्याने पोलिसांसह वस्तीतील लोकांना सांगितली. बाबुलालच्या घरासमोर लोकांची गर्दी जमली. माहिती मिळताच ठाणेदार प्रशांत पांडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. तेव्हा बाबुलालने दार उघडले. आत मधील दृश्य पाहून पोलीसही हादरले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. बाबुलालला पोलिसांनी अटक केली.
© The Indian Express (P) Ltd