नागपूर : विषारी सापाला (रसेल वायपर) पकडण्याच्या प्रयत्नात एका युवकाला सापाने दंश केला. मात्र दंश केलेला साप विषारी की बिनविषारी याची माहिती नसल्याने या युवकाने थेट सापाला पकडून थेट नागपूरच्या मेयो इस्पितळात धाव घेतली. तेथे विषारी साप बघताच डॉक्टर्स, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. कोराडी परिसरात साप पकडण्याचे प्रशिक्षण न घेतलेल्या पंकज सपाटे (३७) रा. कोराडी असे या युवकाचे नाव आहे. तो स्वत:ला सर्पमित्र म्हणून घेत असला तरी त्याला साप पकडण्याचे किंवा यासंदर्भातील अन्य बाबींची अर्धवटच माहिती आहे. एका अप्रशिक्षित व्यक्तीने साप पकडला.
हेही वाचा >>> नागपूर : शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाची सेवा करणारे ‘के.के.’ कोण होते?
या सापाने दंश केल्यावर तो विषारी की बिनविषारी हे माहीत नसल्याने हा व्यक्ती सापासह थेट नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पोहचला. रुग्णाच्या हातात साप बघून मेयोतील डॉक्टर-कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. सध्या रुग्णावर मेयोतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत. शनिवारच्या घटनेचे चलचित्र व्हायरल झाल्याने हा प्रकार पुढे आला. पंकजला शनिवारी संध्याकाळी कोराडी परिसरातील औष्णिक विद्युत केंद्राच्या कर्मचारी वसाहतीतील एका मैदानाजवळ साप दिसला. त्यावेळी तेथे मुले खेळत होती. साप त्यांना चावेल हे लक्षात घेऊन पंकजने सापाला पकडण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा >>> नागपूर : ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर; वर्धेत झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमताने निवड
या प्रयत्नात सापाने त्याच्या हाताला चावा घेतला. अखेर पंकजने सापाला पकडले. परंतु हा साप विषारी की बिनविषारी हे त्याला माहीत नव्हते. त्यामुळे तो सापाला पकडून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला. पंकजने सांगितलेली घटना लक्षात घेता डॉक्टरांनी त्याला तातडीने नागपुरातील मेयो रुग्णालयात पाठवले. रुग्णवाहिकेतही पंकज सापाचे तोंड पकडूनच होता. नागपुरात थेट मेयो रुग्णालयात पोहचल्यावर साप बघताच येथील कर्मचारी-डॉक्टरांची तारांबळ उडाली. तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिली गेली. त्यानंतर डॉ. सागर पांडे यांच्या विनंतीवरून पाच मिनिटात सर्पमित्र तेथे पोहचले. डॉक्टरांनी पंकजवर झटपट उपचार सुरू केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे, पंकजने पकडलेला साप हा अतिविषारी ‘रसेल वायपर’ होता.