लोकसत्ता टीम
नागपूर: पत्नी विरहातून मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने पंधरा वर्षांपूर्वी दोन मुले व कुटुंब सोडून नागपूर गाठले. कुटुंबाशी संपर्कही तोडला. अपघातात जखमी अवस्थेत त्याला पोलिसांनी नागपुरातील मेयो रुग्णालयात दाखल केले. सेवा फाऊंडेशनने आर्थिक मदतीतून उपचार करवून घेतला. ही माहिती समाज माध्यमावर टाकल्यावर सदर व्यक्तीचे कुटुंब नागपुरात येऊन रुग्णाला घेऊन गेले. तब्बल पंधरा वर्षानंतर हा व्यक्ती घरी परतला.
धरमसिंग असे रुग्णाचे नाव आहे. तो मध्य प्रदेशातील एका गावात शेतीकाम करत होता. लग्नानंतर हे कुटुंब आनंदाने जगत होते. त्यांना मुलगा व मुलगी असे दोन आपत्य झाली. मुले लहान असतांनाच पत्नीचे निधन झाले. त्यामुळे धरमसिंग दु:खी झाला. काही वर्षे स्वत:ची समजूत काढत तो मुलांचा सांभाळ करत होता. परंतु पत्नी जगात नसल्याच्या दु:खाने तो नैराश्यात गेला होता. त्यानंतर त्याने काम करण्याच्या नावावर स्वत:च्या १० ते १५ वर्षांच्या मुलगा व मुलीला भावाकडे सोडत नागपूर गाठले.
आणखी वाचा-अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
नागपुरात दोन वेळच्या जेवणाची सोय झाल्यावर तो रस्त्यावर कुठेही राहत होता. या काळात त्याने कुटुंबियांशी संपर्क तोडला. काही दिवसांपूर्वी त्याचा अपघात झाला. पायाचे हाड मोडलेल्या स्थितीत तो रस्त्याच्या कडेला पडून होता. पोलिसांनी त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल केले. परंतु रुग्णाकडे एकही कागदपत्र नसल्याने शासकीय योजनेचा लाभ त्याला मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने सेवा फाऊंडेशनला शस्त्रक्रियेसाठी आवश्यक इम्प्लांट व औषधांसाठी मदत मागितली. फाऊंडेशननेही पुढे येत हा खर्च उचलून मेयोतील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत यशस्वी उपचार केला. त्यात अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण व उपअधिक्षक डॉ. सागर पांडे यांची मदत झाली.
उपचारादरम्यान रुग्णाला सेवा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी बोलते करत त्याच्या गावाचे नाव जाणून घेतले. ही माहिती सेवा फाऊंडेशनकडून समाज माध्यमावर टाकली गेली. दुसरीकडे सेवा फाऊंडेशनच्या मध्य प्रदेशातील चमूलाही मदतीचे आवाहन केले गेले. या रुग्णाबाबतची माहिती समाज माध्यमावर प्रसारित झाल्यावर रुग्णाच्या कुटुंबियांनी मध्य प्रदेशात वाचली. तातडीने रुग्णाचा भाऊ व तामिळनाडूला नोकरी करणारा मुलगा नागपुरातील मेयो रुग्णालयात ३ डिसेंबरला पोहचला. दोघांनीही संबंधित वार्डात रुग्णाची भेट घेतली. अचानक रुग्ण व त्याचा भाऊ व मुलगा समोर आल्यावर सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. तर दुसऱ्या दिवशी कुटुंबिय रुग्णाला घरी परत घेऊन गेले. सगळ्यांनी यावेळी उपचार करणाऱ्या डॉक्टर- परिचारिकांसह सेवा फाऊंडेशनचे आभार मानले.