लोकसत्ता टीम
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी दरम्यान मद्यप्राशन करणाऱ्या ५ पर्यटकांना ताडोबा व्यवस्थापनाने प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. एकूण २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सफारीच्या वेळी एका गाईडने मोहर्ली गेट येथून जिप्सीमध्ये पर्यटकांना दारू पिऊन प्रवास करताना पाहिले. जिप्सीमध्ये दारू पिण्यास गाईडने नकार देऊनही पर्यटकांनी ते स्वीकारले नाही. यामुळे त्यांनी जिप्सी थेट मोहर्ली गेटपर्यंत आणली. मोहर्ली कार्यालयात ही माहिती देण्यात आली. त्यानंतर ताडोबा व्यवस्थापनाने ५ पर्यटकांना दंड ठोठावला. याआधीही काही पर्यटक दारू पिताना दिसले असून त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.