नागपूर : नौदलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आणि त्यांचे व्यवस्थापनाचे कौशल्य अद्ययावत ठेवण्याचे काम भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम, नागपूर) करणार आहे. यासाठी भारतीय नौदल आणि आयआयएम, नागपूर यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. आयआयएम नागपूरचा सशस्त्र दलाशी झालेला पहिलाच करार आहे.
सशस्त्र दलातील विशेषत: नौदलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना व्यवसाय व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन, ब्लॉक चेन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, सप्लाय चेन, लॉजिस्टिक मॅनेजमेंट या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देणे तसेच कौशल्य वाढवण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. त्यासाठी भारतीय नौदल आणि ‘आयआयएम नागपूर’ यांनी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सामंजस्य करण्यात आला आहे. या कराराचा उद्देश अधिकारी, कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाचे ज्ञान अद्ययावत करणे आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची प्रगती तर होईल, पण नौदलाचे व्यवस्थापन आणखी अचूकपणे होण्यास मदत होईल. याशिवाय नौदलातून निवृत्त झाल्यानंतर कर्मचारी, अधिकाऱ्यांना हे व्यवस्थापन कौशल्य नागरी सेवेत काम करताना उपयोगी ठरणार आहे. स्वेच्छानिवृत्ती किंवा निवृत्त कर्मचाऱ्यांना नागरी सेवेत नोकरी करण्याची इच्छिणाऱ्यांना ‘आयआयएम नागपूर’चे प्रशिक्षण कामात येणार आहे. संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे ‘आयआयएम नागपूर’चे प्रमाणपत्र राहणार आहे.
‘आयआयएम’ नागपूरचे संचालक डॉ. भीमराया अंबाण्णा मेत्री म्हणाले, ऑन-कॅम्पस आणि ऑफ-कॅम्पस कार्यक्रम संयुक्तपणे तयार केला आहे. त्यामुळे भारतीय नौदलाचे आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न साकार करण्यास मदत होईल. भारतीय नौदलाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी म्हणाले, या सामंजस्य करारामुळे कर्मचारी भारतीय नौदलास नागरी जगतातील ताज्या घडामोडींबाबत अद्ययावत ठेवण्यासाठी ‘आयआयएम’च्या संपर्कात असतील.
सशस्त्र दलाचा ‘एमएमआय’ नागपूरशी पहिलाचा सामंजस्य करार आहे. यापूर्वी देशातील संस्थांशी सशस्त्र दलाचे करार झाले आहे. या करारामुळे सेवेतील कर्मचारी, अधिकारी व्यवस्थापनाचे अद्ययावत प्रशिक्षण मिळेल. तसेच हे कौशल्य निवृत्तीनंतर कर्मचारी, अधिकाऱ्यांना सशस्त्र दलाबाहेर नोकरी, व्यवसाय करण्यास उपयोगी पडणार आहे. – विंग कमांडर रत्नाकर सिंह, जनसंपर्क अधिकारी, संरक्षण मंत्रालय