महेश बोकडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राज्याच्या काही भागात ‘एसटी’ बसच्या अपघाताने बऱ्याच प्रवाशांना जीव गेला. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे बघत आता महामंडळाने यंत्र अभियंता ते सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकांपर्यंत सगळ्यांना दैनंदिन निश्चित संख्येने बसेसची गुणवत्ता तपासणीची सक्ती केली आहे. या तपासणीचे निरीक्षण संबंधितांना देण्याचे राज्यातील सगळ्या विभाग नियंत्रकांना मिळालेल्या आदेशात नमूद आहे.

हेही वाचा >>>… म्हणून सरसंघचालक मशिदीत गेले ; ॲड. प्रकाश आंबेडकर

‘एसटी’ महामंडळाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी वाहनांची गुणवत्तापूर्वक देखभाल- दुरुस्तीनंतरच बसेस मार्गावर काढण्याबाबत सूचना दिल्या जातात. त्यानंतरही राज्यातील बऱ्याच भागात एसटी बसचे अपघात होतात. त्यामुळे प्रवशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आता महामंडळाने बसेसच्या गुणवत्तापूर्ण तपासणीचे जुने आदेश रद्द करत नवीन आदेशानुसार कारवाईचे आदेश काढले. त्यानुसार यंत्र अभियंत्याला आगार भेटीच्या वेळेला तेथील किमान ५ वाहनांची आणि इतर दिवशी विभागीय कार्यशाळेतील २ बसेसची गुणवत्ता तपासणी करायची आहे.

हेही वाचा >>>… नागपूर : तोतया ‘सोशल मीडिया’ विश्लेषक अजित पारसेवर फसवणुकीचा गुन्हा ; अनेकांकडून उकळली कोटींची खंडणी

उप यंत्र अभियंत्याला दररोज विभागीय मुख्यालयाच्या आगारात त्या आगाराशी संबंधित किमान ५ वाहनांची तपासणी करायची आहे. किंवा इतर आगाराच्या किमान ५ वाहनांची तपासणी करायची आहे. सहाय्यक यंत्र अभियंत्याला दररोज विभागीय मुख्यालयाच्या आगारातील त्याच्याशी संबंधित ५ बसेसची तपासणी करायची आहे. किंवा मुख्यालयाच्या आगाराशिवाय विभागातील इतर आगाराच्या ५ बसेसची तपासणी करायची आहे. आगार व्यवस्थापकांना दररोज त्यांच्या आगारातील ५ बसेसची गुणवत्ता तपासणी करायची आहे. तर आगारातील सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकांनाही त्या आगारातील ५ बसेसची दैनंदिन तपासणी करायची आहे.

रिक्त पदांमुळे अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण

तपासणीनंतर वाहनांच्या दोषांसह इतर सगळ्या निरीक्षणांची नोंद आगारातील कार्यशाळा नोंदवहीत घेऊन संबंधितांनाही सूचना देण्याबाबतही विभाग नियंत्रकांना महामंडळाने दिलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या वृत्ताला नागपुरातील विभाग नियंत्रक कार्यालयानेही दुजोरा दिला आहे. दरम्यान, राज्यातील बऱ्याच भागात यांत्रिक संवर्गातील बरीच पदे रिक्त आहेत. त्यामुळे सेवेवरील अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण असताना हे पूर्वीहून जास्त बस तपासणीचे आवाहन पेलावे लागणार आहे. पूर्वी बऱ्याच अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना एक ते दोनच बसेस तपासावी लागत होती, हे विशेष.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mandatory for mechanical engineer assistant superintendent to inspect st buses on daily basis zws
Show comments