अमरावती : संपूर्ण विदर्भात कडाक्याची थंडीत जाणवत असून ही थंडी आंब्याला मोहोर येण्यासाठी अनुकूल मानली जात आहे. उशिरापर्यंत झालेला पाऊस, पावसाळा संपल्यानंतरही जमिनीत टिकून राहिलेली ओल, कमी थंडी आणि ढगाळ वातावरण, पाऊस आदी प्रतिकूल स्थितीमुळे यंदा आंबा मोहोर येण्याची प्रक्रिया दोन-तीन टप्प्यांत होणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अमरावती शहरात सोमवारी किमान ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. विदर्भात सर्वत्र तापमान खाली घसरले आहे. आणखी तीन दिवस अशीच परिस्थिती राहील. २० डिसेंबरपर्यंत विदर्भात वातावरण कोरडे राहील. आंब्याला मोहोर येण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. काही ठिकाणी फुट सुरू झाली आहे. पुढील आठ दिवसांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आंबा मोहोरण्याची शक्यता आहे. सध्या आंब्याच्या बागेत कोणत्याही परिस्थितीत पाणी देऊ नये. तसेच मोहोर येण्यापूर्वी कीटकनाशक, बुरशीनाशक, तसेच अन्नद्रव्याची फवारणी केल्यास फायदा होईल. थंडी कमी होताच संत्रा बागेत फुट निघण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी संत्रा बागेत हलके पाणी देणे आवश्यक आहे. अती तडण दिल्याने झाडाचे आरोग्य बिघडते, अशी माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे शेती व हवामान तज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांनी दिली आहे.

हेही वाचा – हे शेतकरी ठरले भाग्यवंत! नियमात बसत नाही मात्र ‘देव’ पावला आणि…

आंबा बागेत ढगाळ वातावरणात नत्र वाढते, तर कर्बोदकांचे प्रमाण कमी होते. म्हणजे नवती निघून मोहोर निघणे थांबते. मोहोर आणि नवतीत निघण्याची स्पर्धा होते. मोहोर ताकदवान असेल तर पाने बारीक निघतात आणि मोहोर जरा बाहेर पडला की ती पाने गळून पडतात. मात्र, पाने ताकदवान असल्यास मोहोर कमकूवत होतो आणि बाहेर पडल्यानंतर तो गळून जातो. त्यामुळे मोहोर ताकदवान होण्यासाठी किंवा नवतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाढ नियंत्रकाचा वापर करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा – विदर्भाच्या अनुशेष मोजणीसाठी सत्यशोधन समिती स्थापन करा, मुख्यमंत्र्यांना पत्र

बागेमध्ये मोहोर येण्यासाठी थंडीची अत्यंत आवश्यकता असते. मात्र एकदा मोहोर आल्यानंतर थंडी कमी होणे अधिक फायद्याचे असते. मोहोर उमलताना जास्त थंडी पडल्यास (अगदी तापमान सात अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्यास) मोहोराच्या फुलांमधील परागकण वाहून नेणारी नलिका (पोलन ट्यूब) खराब होऊ शकते. त्यामुळे परागकण खाली गर्भागारापर्यंत जात नाहीत. त्यामुळे फळधारणा होण्यास अडथळा निर्माण होतो. पर्यायाने चांगला मोहोर येऊनसुद्धा फळधारणा अत्यंत कमी होते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

Story img Loader