अमरावती : हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला, काही लोकांनी त्याचा गैरवापर केला. ही योजना यशस्वी व्हावी व त्याचा योग्य लाभ शेतकऱ्यांना मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. पीकविमा योजनेविषयी सरकारच्या गाठिशी चांगले – वाईट अनुभव आहेत. पण ही योजना सरकारला कोणत्याही स्थिती बंद करायची नाही, असे वक्‍तव्‍य राज्‍याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी येथे केले.

शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्‍या त्यांच्या या विधानाने वाद निर्माण‍ होण्याची शक्यता आहे. कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या वतीने येथील कृषी विकास परिषद व प्रदर्शनीचे उद्घाटन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. तत्‍पुर्वी प्रसारमाध्‍यमांशी बोलताना त्‍यांनी पीक विमा घोटाळ्याविषयी संताप व्‍यक्‍त केला.

माणिकराव कोकाटे म्‍हणाले, हल्‍ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही. आम्‍ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली. ही योजना चांगली आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. पण, या योजनेलाही गैरव्यवहाराचे ग्रहण लागले. यामुळे सरकार अडचणीत आलेले नाही, पण यातून आता काही सुधारणा निश्चितपणे कराव्या लागणार आहेत. ही योजना सरकारला कोणत्याही स्थिती बंद करायची नाही. त्यात सुधारणा करायची आहे. या प्रकरणी गैरप्रकार टाळण्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत याविषयी योग्य तो निर्णय घेतला जाईल.

माणिकराव कोकाटे म्हणाले, सद्यस्थितीत पीक विम्याचे ४ लाख अर्ज नामंजूर करण्यात आलेत. सरकार या प्रकरणी कुठेही अडचणीत नाही. अर्जदार व एजन्सी चालकांच्या चुकांमुळे असे घडले असावे असा माझा अंदाज आहे. त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल. पण यात सुधारणा करण्याची गरज आहे.

कृषी विभागात सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामु्ळे आकृतीबंध तयार करून भरती करण्याचा विचार करत आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता यावा यासाठी त्यांना एका विशेष सिरीजचे क्रमांक देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. या प्रकरणी कृषी मंत्र्यांपासून शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत एक कायमस्वरुपी नंबर असेल, अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली.

Story img Loader