नागपूर : मनीषनगर आणि वर्धार्गाला जोडणारा अत्यंत मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगवरील भुयारी मार्ग (आरयुबी) दोनदा मुदतवाढ मिळाल्यानंतर अखेर पूर्ण झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी या पुलाचे लोकार्पण होणार आहे.या भुयारी मार्गामुळे मनीषनगर, नरेंद्रनगर, बेसा, बेलतरोडी येथून वर्धा मार्गावर येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई – हावडा रेल्वे मार्गावरील नागपुरातील मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगचे फाटक होते. हा रेल्वे मार्ग अतिशय व्यस्त असल्याने ते दिवसभरात अनेक वेळा बंद राहात असल्याने मनीषनगर, नरेंद्रनगर आणि बेसा, बेलतरोडी येथील नागरिकांना वर्धा रोड, सोमलवाडाकडे येण्यासाठी फटकावर प्रतीक्षा करावी लागत असे. त्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारी २०२३ मध्ये वाढीव किंमतीसह निविदा अंतिम करण्यात आली. प्रत्यक्ष कामाला जुलै २०२३ सुरुवात झाली आणि फेब्रुवारी २०२४ पर्यंत काम पूर्ण करायचे उद्दीष्टे होते. परंतु दिलेल्या मुदतीमध्ये हे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर बाधकाम पूर्ण करण्याची मुदत १ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आली. या मुदतवाढीनंतरही काम पूर्ण झाले नाही. अखेर भुयारी पूल आणि रस्त्याचे बांधकाम २३ जानेवारी २०२५ ला पूर्ण झाले आहे. परंतु लोकार्पणासाठी पूल सुरू करण्यात आले नव्हते. आता मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २८ जानेवारीला लोकार्पण करण्यात येत आहे.
असा आहे रेल्वे अंडर ब्रिज
या प्रकल्पाची एकूण किंमत ३३.८३ कोटी रुपये असून, आरयूबीची लांबी १९० मीटर, रुंदी ८ मीटर आणि उंची ४ मीटर आहे. आरयूबीचे निर्माण मुंबई-हावडा व दिल्ली-चेन्नई या निरंतर व्यस्त रेल्वे मार्गावर करण्यात आले आहे. या अंडर ब्रिजमध्ये पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पादचारी मार्ग देखील उपलब्ध करण्यात आला आहे.
आरयूबीमुळे मनीषनगर परिसर आणि वर्धा मार्ग यांच्यात एक चांगला सेतून निर्माण झाला. याचा मोठा फायदा मनीषनगर, नरेंद्रनगर, बेसा, घोगली आणि बेलतरोडी येथील हजारो नागरिकांना होईल. रेल्वे फाटकामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळेल, तसेच यामुळे या परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळेल, तसेच मनीषनगर येथील रहिवाश्यांना वर्धा मार्गावर सहज प्रवेश मिळवता येईल. लोकार्पणानंतर लोकांना सहज ये-जा करण्यासाठी सुलभता मिळेल. रेल्वे क्रॉसिंगवरील ताटळत राहण्यापासून मुक्ती मिळणार आहे. त्यासोबतच वेळेची बचत होणार आहे.