नागपूर : शहरातून भोपाळ, बैतूल, छिंदवाडा या शहराकडे जाण्यासाठी प्रामुख्याने मानकापूर उड्डाणपुलाचा वापर केला जातो. मात्र, दोन्ही बाजूंना उड्डाणपुलाच्या मधोमध असलेला मानकापूर चौक अपघातासाठी ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत आहे.
त्यामुळे सोयी-सुविधेसाठी तयार करण्यात आलेला पूल सुसाट वाहनांमुळे नागरिकांवर मात्र नेहमी जीव मुठीत धरून रस्ता ओलांडण्याची वेळ आली आहे. कोराडीसह पेंच व्याघ्र प्रकल्पाकडे जाण्यासाठी मानकापूर चौकाला जोडणाऱ्या दोन्ही उड्डाणपुलाचा वापर केला जातो. मानकापूर क्रीडा संकुलात सरावासाठी जाणारे खेळाडू या पुलाचा वापर करतात. मानकापूर चौकातूनही चहुबाजूंना जाण्यासाठी लहान रस्ते तयार करण्यात आले आहे.
आणखी वाचा-गडचिरोली : ‘मायक्रोस्कोप’ चोरी प्रकरण; नव्याने कार्यालयीन चौकशी, तपासावर प्रश्नचिन्ह
त्यामुळे चौकातून जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. यासोबतच दोन्ही उड्डाण पुलाच्या मधोमध मानकापूर चौकातील सिग्नल व्यवस्थाही नेहमी कोलमडलेली असते. चौकात उतरणाऱ्या उड्डाणपुलाची सुरुवात आरबीआय चौकातून होते. त्यामुळे शहरातून बाहेर जाण्यासाठी हा पूल सोयीचा ठरतो. त्यामुळे त्यावर वाहनांची रेलचेल असते. वाहने दुसऱ्या उड्डाणपुलावर जाण्यासाठी निघतात. मात्र, अचानक दोन्ही पुलाच्या मध्ये असलेल्या मानकापूर चौकात वाहनांना गती कमी करावी लागते.
या प्रयत्नात वाहनांवरील नियंत्रण सुटते. त्यामुळे चौकातील वाहनांना धडकण्याची शक्यता असते. मार्च महिन्यांतच एका भरधाव ट्रकचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने मानकापूर चौकात उभ्या १३ वाहनांना धडक दिली होती. सुदैवाने यात जीवितहानी झाली नव्हती. मात्र, हा अपघात दोन्ही पुलाच्या मध्ये असलेल्या चौकातील संभ्रमामुळे झाला होता. उड्डाणपुलावरून जाणाऱ्या वाहनचालकांना अंदाज येत नसल्यामुळे चौकात अपघातांच्या घटना वाढल्या आहेत.
आणखी वाचा-आईवडीलांना शिवीगाळ; मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून
नवख्या चालकांसाठी धोकादायक
शहरात प्रथमच प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांसाठी मानकापूर उड्डाणपूल धोकादायक आहे. रस्त्याचा आणि चौकाचा अंदाज बांधण्यात त्याची गफलत होते. ही बाब अपघाताला निमंत्रण देणारी ठरते. उड्डाणपुलाच्या लँडिंगवरच चौक असल्यामुळे अनेकदा भरधाव वाहन अनियंत्रित होत असतात.
चौकात खेळाडूंची गर्दी
शहरातील विविध शेकडो क्रीडापटू मानकापूर क्रीडा संकुलाच्या मैदानावर सराव करतात. त्यामुळे मानकापूर चौकात सकाळी आणि सायंकाळी खेळाडूंची मोठी गर्दी होते. सायकल आणि दुचाकींनी जाणारे खेळाडू चौकातून जाण्याऐवजी मधूनच पुलावर शॉर्टकट घेतात. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चौकातून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या रस्त्यावरून नेहमी विरुद्ध दिशेने जाणारी वाहने दिसतात. तसेच चक्क पुलावरूनही येणारी वाहने अचानक बाजूच्या लहान रस्त्यावर वळण घेतात, त्यामुळे अपघाताची शक्यता दाट आहे.
आणखी वाचा-विकृत मानसिकतेच्या तरुणाला अखेर पोलिसांनी केले गजाआड
उड्डाणपुलावरून येणारी भरधाव वाहने बघता मानकापूर चौकात वाहन थांबवताना मनात नेहमी भीती असते. मानकापूर चौकात अनेकदा अपघात झाले आहेत. त्यामुळे चौकातून रस्ता ओलांडतानाही खूप काळजी घ्यावी लागते. अनेकदा वाहतूक पोलीस नसतात. त्यामुळे सिग्नल तोडून पळणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. -दीक्षा अवघड
मानकापूर चौकात सायंकाळच्या सुमारास वाहनांची संख्या वाढते. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून दोन पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी चौकात तैनात करण्यात आले आहे. उड्डाणपुलावरून जाणारी वाहने भरधाव असतात. अपघात होऊ नये म्हणून योग्य ती काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे. -प्रशांत अन्नछत्रे, पोलीस निरीक्षक-वाहतूक शाखा