नागपूर: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. देशभरात  राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला. राजकीय वर्तुळाबरोबरच सामाजिक आणि इतरही क्षेत्रांमधून मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशाने एक अभ्यासू अर्थतज्ञ आणि मितभाषी व्यक्तीमत्व गमावल्याच्या भावना व्यक्त होत  आहेत. देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सिंग यांच्या निधनावर समाज माध्ममावर पोस्ट केली होती. आज त्यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली देणारा व्हिडीओ संदेश जारी केला आहे. १ जुलै २००६ रोजी नागपूरमध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विदर्भात येऊन नागपूरमध्ये विदर्भातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त, शेतकरी आतम्हत्याग्र्सत अशा सहा जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ३७५० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. यावेळी त्यांनी दीक्षाभूमिला भेट दिली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेल्या दीक्षाभूमीवर आतापर्यंत केवळ तीनच पंतप्रधानांनी हजेरी लावली. . एनडीएच्या शासनाच्या काळात अटलबिहारी वाजपेयी हे पहिले पंतप्रधान होते. तर यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधान असलेले डॉ. मनमोहन सिंग हे दीक्षाभूमीला भेट देणारे दुसरे पंतप्रधान होते. त्यांनी २००६ मध्ये दीक्षाभूमीला भेट दिली होती. तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे व डॉ. आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे त्यांनी दर्शन घेतले. दीक्षाभूमी कोट्यवधी भारतीयांचे खरोखरच प्रेरणास्थान असून, याठिकाणी भेट देण्याचा अनुभव हा अत्यंत प्रसन्नतेची अनुभूती देणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर दीक्षाभूमीला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसरे पंतप्रधान ठरले.

हेही वाचा >>>आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’

अस्थिकलशाचे दर्शन घेतले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सदस्य सुधीर फुलझेले यांनी त्यावेळच्या आठवणी सांगितल्या. डॉ. मनमोहन सिंग यांच्या ताफ्याचे दीक्षाभूमी परिसरात आगमन झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारापासूनच काही अंतरावर गाडी सोडून ते आमच्यापर्यंत आले. समितीचे सर्व सदस्य आणि काँग्रेसचे काही नेते त्यांच्या स्वागतासाठी उभे होतो. समितीचे तत्कालीन सचिव सदानंद फुलझेले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी स्तुपात प्रवेश केला. त्यांनी सर्वप्रथम अस्थिकलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली. तसेच संपूर्ण दीक्षाभूमी परिसराला एक फेरी मारली. यावेळी बाहेर शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना त्यांनी अभिवादनही केले. शेवटी समितीच्या सदस्यांसोबत भेट घेत चर्चा केली.

 प्रेरणादायी व्यक्तिमत्व

डॉ. मनमोहन सिंग यांना आधी केवळ छायाचित्रात पाहिले होते. परंतु, प्रत्यक्षात पाहण्याची संधी दीक्षाभूमिला आल्यावर मिळाल्याचे सुधीर फुलझेले यांनी सांगितले. उंच बांधा,  गौरवर्ण आणि रुबाबदार व्यक्तिमत्व होते. त्यांचे ज्ञान, बोलणे आणि देहबोली प्रचंड प्रेरणादायी होती असेही फुलझेले यांनी सांगितले.

Story img Loader