अकोला : माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष व कट्टर शिवसैनिक मनोहर जोशी यांचे कला आणि कलाकारांवर विशेष प्रेम होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेच्यानिमित्ताने १९९८ साली ते अकोल्यात आले असता त्यांच्यातील कलाप्रेमीचा प्रत्यय आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोल्याशी मनोहर जोशी यांचे ऋणानुबंध शेवटपर्यंत कायम राहिले. जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. मनोहर जोशी यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला. महायुतीचे महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे शुक्रवारी पहाटे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राज्यात शोककळा पसरली आहे. ‘पंत’ म्हणून मनोहर जोशी सुपरिचित होते. अकोला जिल्ह्यात मनोहर जोशी यांचे अनेक दौरे झालेत. त्यापैकी १९९८ मध्ये त्यांच्या दौऱ्याच्या आठवणीला ज्येष्ठ छायाचित्रकार डॉ. माधव देशमुख यांनी उजाळा दिला.

हेही वाचा…..अन् मनोहर जोशींचे विरोधी पक्षनेते पद गेले, काय घडले होते नागपूर अधिवेशनात ?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सभेनिमित्त अकोल्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे देखील सहभागी झाले होते. शिवणी विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यावर डॉ. माधव देशमुख यांनी त्यांचे छायाचित्र काढले. त्या काळी तंत्रज्ञान एवढे प्रगत नसल्याने छायाचित्र ते त्याची प्रत ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने चालायची. मात्र, देशमुख यांनी काही मिनिटांमध्ये छायाचित्राची प्रत नेत्यांपुढे सादर केली. या कलेमुळे बाळासाहेब ठाकरे यांच्यासह मनोहर जोशी यांना आश्चर्य वाटले. त्यांनी छायाचित्रकाराकडे स्टुडिओला भेट देण्याची सदिच्छा व्यक्त केली. त्यानुसार बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी यांच्यासह इतर नेत्यांनी छायाचित्रकाराच्या स्टुडिओला आवुर्जन भेट दिली.

हेही वाचा…‘जनसंवाद’ अर्ध्यावर सोडून उद्धव ठाकरे मुंबईकडे; म्हणाले, मनोहर जोशी…

एवढे मोठे नेते आपल्या स्टुडिओत आल्याने त्यावेळी भारावून गेलो होतो, अशी आठवण डॉ. माधव देशमुख यांनी सांगितली. मनोहरपंत जोशी यांच्यासोबत ऋणानुबंध कायम होते, असेही ते म्हणाले. दरम्यान, अकोल्यातील दगडीपूल यासह अनेक विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते झाले होते.

बाळासाहेबांची ‘ठाकरे’ शैली

अकोल्यात १९९८ च्या दौऱ्यात छायाचित्रकार डॉ. माधव देशमुख यांनी आठवण म्हणून डायरीवर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची स्वाक्षरी घेतली होती. त्यानंतर ते बाळासाहेबांकडे स्वाक्षरीसाठी गेले. ‘‘मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीखाली मी स्वाक्षरी करणार नाही,’’ असे ठाकरे शैलीत बाळासाहेब म्हणाले. मग दुसऱ्या डायरीवर बाळासाहेब ठाकरे यांची स्वाक्षरी घ्यावी लागली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manohar joshi had a special love for art remained good connections with akola ppd 88 psg