बुलढाणा : येथे उद्या, बुधवारी आयोजित सकल मराठा समाजाचा मोर्चा सात वर्षांपूर्वीच्या आंदोलनाचा विक्रम मोडून काढणारा ठरावा, यासाठी आयोजक युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. या मोर्च्यात आरक्षण लढ्याचे सामाजिक ‘आयकॉन’ ठरलेले मनोज जरांगे यांचे कुटुंबीय सहभागी व्हावे यासाठी आयोजक कसोशीने प्रयत्न करीत असल्याचे वृत्त आहे.
आरक्षणासाठी जरांगे यांनी जालना जिल्ह्यात उपोषण छेडले आहे. त्यांच्या उपोषणाने राज्य सरकारची झोप उडाली असून गल्ली ते दिल्लीपर्यंत त्यांचे नाव गाजत आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बुलढाणा येथील क्रांती मोर्चात बोलवण्यासाठी समन्वयकांनी प्रयत्न सुरू केले आहे. हे कुटुंब बुलढाण्याच्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाल्यास या मोर्चाची उंची अर्थातच वाढणार आहे. त्यामुळे यादृष्टीने काही समन्वयक प्रयत्नशील असून सहभागाची जास्त शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार, जरांगे पाटील यांची मुलगी मोर्चाला संबोधित करण्याची दाट शक्यता आहे.
मागील मोर्च्यात छत्रपती होते उपस्थित
सात वर्षांपूर्वीच्या मोर्च्यात छत्रपती संभाजी राजे यांनी उपस्थिती लावली होती. कुठलाही गाजावाजा वा बडेजाव न करता सामान्य माणसाप्रमाणे ते सहभागी झाले होते. यंदाच्या मोर्चात ते सहभागी होतात काय, हा देखील उत्सुकतेचा विषय ठरला आहे.