चंद्रपूर : राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरातही पडली आहे, मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या आंदोलनात जरांगे पाटील यांची मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात समाविष्ट करावे ही मागणी चुकीची आहे, त्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ विरोध करीत असल्याचे महासंघाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने चंद्रपुरात ओबीसी महापंचायतीचे आयोजन केले आहे. या महापंचायतीमध्ये ओबीसी समाज व इतर जातनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे वस्तीगृह तात्काळ सुरू करा व मराठा समाजाला सरसकट ओबीसी वर्गात सामील करू नये असे ठराव मांडण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता द्या, आधीच ओबीसी(विजे, विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल ४२३ च्या वर जाती आहे त्यामध्ये आता मराठा आले तर आपल्या समाजाला न्याय मिळणार नाही, मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, जर त्यांच्याकडे निजामशाहीचे दाखले पुरावे असतील तर त्यांना आरक्षण द्या पण सरसकट नको, असे महासंघाचे म्हणणे आहे.
ओबीसी महापंचायतीमध्ये सोमवार ११ सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलन करणार आहे. १७ सप्टेंबर ला ओबीसी समाजाचा महामोर्चा विविध मागण्यांसाठी काढण्यात येणार आहे. ओबीसी महापंचायती मध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ, तेली महासंघ, माळी महासंघ व विविध राजकीय पदाधिकारी सहित एकूण २० संघटना सामील झाल्या होत्या. पंचायत मध्ये बबनराव फंड, डॉ. अशोक जीवतोडे, सचिन राजूरकर ,माजी देवराव भांडेकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, संदीप गिरे, सतीश भिवगडे, पुरुषोत्तम सातपुते, अरुण तीखे,शाम लेडे, रजनी मोरे, डॉ संजय घाटे, अनिल धानोरकर, सूर्यकांत, खनके मनीषा बोबडे, गणेश आवारी, अविनाश पाल , निलेश बेलखेडे, रवींद्र टोंगे, राजेंद्र खांडेकर, अजय बलकी,गोविंदा पोडे, पारस पिपलकर, हितेश लोडे,किशोर टोंगे, रवी गुरनूले अनिल डहाके, सतीश मालेकर आदी उपस्थित होते.