जालना : मराठा समाजाने आतापर्यंत समजूतदारपणा दाखविला आहे. मग आमच्यावर आता नांगर फिरविता की काय, असा सवाल आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी आंतरावली सराटी येथे केला.
मराठा तरुण-तरुणींनी आरक्षणाच्या संदर्भात समजूतदारपणाची भूमिका घेण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मनोज जरांगे-पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ओबीसींना दुखवा असे आम्ही म्हणत नाही. मंडल आयोगाने दिलेले आरक्षणच ओबीसींना द्या. बाठिया आयोगाने केलेल्या सर्वेक्षणात ३७ टक्के लोकसंख्येला ३२ टक्के आरक्षण देण्याचे गणित करणारा कोण तज्ज्ञ आहे, हे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगावे.
हेही वाचा >>> कुणबी प्रमाणपत्र समितीच्या कामकाजावर परिणाम? तेलंगणमधील निवडणुकीचा फटका
हा लढा गरजवंत गोरगरीब मराठय़ांचा आहे. कुणबी म्हणजे शेतकरी त्यामुळे मराठा समाजास ते प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. मुख्यमंत्री शिंदे प्रामाणिक असून दिलेला शब्द पाळणारे आहेत. उद्याचा दिवस त्यांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिलेला शब्द खरा करून दाखवावा.