नागपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी मराठा समाजाने केंद्राकडे आरक्षणाची ५० टक्के मर्यादा काढून टाकण्याची मागणी लावून धरावी. त्यासाठी ओबीसी समाज मराठा समाजासोबत राहिल, असा सल्ला दिला होता. मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मात्र तायवाडे यांचा हा सल्ला धुडकावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा घातली आहे.
हेही वाचा >>> भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद,कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांची भेट
केंद्राने घटनेत दुरुस्ती करून मर्यादा वाढवल्यास मराठा समाजाला १२ ते १३ टक्के आरक्षण मिळू शकेल. तसेच ओबीसी समाजाचे देखील आरक्षण कायम राहील. सरकारला सरसकट एखाद्या जातीला दुसऱ्या जातीचे प्रमाणपत्र देता येणे शक्य नाही.मराठा हा समाज आहे व समाजाला आरक्षण मिळत नाही तर जातीला मिळते. असे डॉ.पंजाबराव देशमुख यांनी मराठा समाजाला सांगितले होते. त्यामुळे विदर्भातील बऱ्याच मराठा समाजातील लोकांनी कुणबी जाती त्यांच्या कागदपत्रांवर नमूद केली. त्यावेळी राज्यघटना अस्तित्वात नव्हती. मात्र आता ती अस्तित्वात आहे. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देता येणे शक्य नाही, असे तायवाडे म्हणाले होते. पण जरांगे यांनी तायवाडेंचा सल्ला फेटाळला..”एक-दोन लोक सोडले तर संपूर्ण ओबीसी हा मराठा समाजासोबत आहे. आम्हाला ५० टक्केच्या मर्यादेत आरक्षण पाहिजे. ते राज्य सरकारला देणे शक्य आहे” असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.