लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : समाजात आरक्षण असणाऱ्या व नसणाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होणार आहे. अशांतता पसरवू शकतात. तो प्रयत्न हाणून पाडा. ज्यात मराठ्यांचे हित नाही, ती चर्चा सरकारसोबत करणार नाही. मराठ्यांच्या एकजुटीतूनच आरक्षण मिळवू, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केला.

अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सकल मराठा समाजाच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, कुठलाही राजकीय पक्ष किंवा नेता मराठा समाजाचा आक्रोश समजून घेत नाही. हे लक्षात आल्याने गरजवंत मराठ्यांनीच आरक्षणाचा लढा हातात घेतला. त्यासाठी एकजुट झालेल्या समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारवर दबाव वाढवला पाहिजे. आरक्षणाच्या मागणीनंतर शासनाने गठित केलेल्या समित्यांनी वेळकाढूपणा केला. हात धुऊन मागे लागल्याने समितीकडूनच पुरावे शोधायला सुरुवात झाली. आतापर्यंत राज्यात अनेक पुरावे मिळाले. त्या सर्वांना येत्या २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण हे निश्चितच मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-जरांगे पाटलांच्या मार्गावर गोमूत्र शिंपडले….चले जावच्या घोषणा!

शासनाने आरक्षण न दिल्यास १७ डिसेंबर रोजी त्यासाठी सकल मराठा समाजाची बैठक होईल. त्यामध्ये सर्वांच्या मताने पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल. आमच्या पूर्वजांनी त्यांच्या काळात अनेक नेत्यांना मोठे केले. त्यांची एकच अपेक्षा होती, भविष्यात तेच नेते आपल्या मुलांच्या मदतीला येतील. ७० वर्षांत कुणीही मदतीला आले नाही. आता समाजाच्या मुलांना मोठे करण्यासाठी आरक्षणाच्या मागणीचा आक्रोश सुरू आहे. कोणत्याही निवडणुकीत नेता, पक्षाला मोठे करण्यापेक्षा आपल्या मुलांना मोठे करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. आरक्षणाअभावी समाजातील मुलांची वाईट परिस्थिती आहे. दुसऱ्या कुणाचेही आरक्षण घेणार नाही. मात्र, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. आरक्षणासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहोत, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

उपोषणाला बसल्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी एक महिन्यांचा वेळ मागितला होता. त्यांना अधिकचा वेळ दिला. अनेक मंत्री येऊन चर्चा करत होते. मंत्री मुंबईतूनच ठरवून विमानाने छत्रपती संभाजी नगरमध्ये येत होते. अख्ख मंत्रिमंडळ बसून होते. मात्र, नियत ढळू दिली नाही. समाजाला धोका देण्यासाठी आंदोलन उभे केले नाही. गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. फक्त एकजुटीने सोबत रहा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil says we will get reservation through the unity of marathas ppd 88 mrj