बुलढाणा : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली आहे. त्यांनी मुदतीत निर्णय घेतला नाही तर, आम्ही वेगळी भूमिका घेणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
ऐतिहासिक उपोषणानंतर सध्या मराठा आरक्षण जनजागृती मोहिमेसाठी निघालेले जरांगे यांनी आज, मंगळवारी सिंदखेडराजा येथे भेट देऊन जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला सुनावले. ४० दिवस सरकारला त्रास देणार नाही, असे सांगून जर सरकारने भूमिका घेतलीच नाही तर मग वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असा गर्भित इशारा त्यांनी दिला. जिजाऊंच्या पावन भूमीत त्यांच्या दर्शनासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. राजमाता जिजाऊ सरकारला सुबुद्धी देवो, असे साकडे घातल्याचे जरांगे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>वडेट्टीवार राहुल गांधीबाबत खरे बोलले! बावनकुळेचा चिमटा
मराठा आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाहीच, असा ठाम निर्धारही त्यांनी बोलून दाखविला. विदर्भात प्रामुख्याने ओबीसी समाज असला तरी येथील मराठा आमच्या पाठीशी खंबीर उभे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही जण ओबीसी व मराठा असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यामुळे काहीही फरक पडणार नाही, असे सांगायलाही ते विसरले नाही.