नागपूर : बहुजन समाज पक्षाने उमेदवारी निश्चितीच्या घोळाची परंपरा कायम राखली आहे. पक्षाने बुद्धम राऊत यांना उत्तर नागपूर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे जाहीर केले आणि एबी फॉर्म दिला. पण, सोमवारी मात्र माजी नगरसेवक मनोज सांगोळे यांनी बसपच्याच एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला.

बसपचे अधिकृत उमेदवार म्हणून बुद्धम राऊत यांचे नाव चार दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. त्यांनी अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता मनोज सांगोळे की बुद्धम राऊत या दोन पैकी कोण बसपचा अधिकृत उमेदवार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संगोळे यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. एबी फॉर्मसह प्रथम उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जातो. त्यामुळे सांगोळे हेच बसपचे अधिकृत उमेदवार राहण्याची शक्यता आहे. पण आज त्यावर छाननी समितीला निर्णय घायचा आहे. ३० ऑक्टोबरला अर्जाची  छाननी होणार आहे. त्यामुळे आजच बसपचा उमेदवार कोण याचा निर्णय होईल.

हेही वाचा >>>भाजप बंडखोर उमेदवार म्हणतात, आमची ‘ निष्‍ठावंत भारतीय जनता पार्टी…’ !  …

बसपने उत्तर नागपूरमध्ये २०१४ च्या निवडणुकीत कमाल केली होती. या पक्षाकडून निवडणूक लढताना निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. यावेळी भाजपने बाजी मारली तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होती. त्यावेळी किशोर गजभिये यांनी ५५ हजार मते घेतली होती. अनुसूचित जातीच्या मतांचे विभाजन होऊन काँग्रेसला फटका बसल्याने भाजपच्या डॉ. मानेंचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. त्यावेळी बसपने काँग्रेसपेक्षा जास्त मते घेतली होती. काँग्रेसला २७.५४ टक्के आणि बसपाला ३०.३७ टक्के मिळाली होती, तर भाजपचे डॉ. मिलिंद माने यांनी ३७.९३ टक्के मते घेत विजय संपादन केला होता. बसपने अनेक निवडणुकांमध्ये ऐनवेळी उमेदवार बदलले आहेत. काहींची उमेदवारी दिल्यानंतर लगेच पक्षातून हकालपट्टी देखील केली आहे. पक्षाची कार्यपद्धती अतिशय अनाकलनीय असल्याचे दिसून आले आहे. आता आगामी विधानसभेसाठी पक्षाचे निष्ठावान म्हणून बुद्धम राऊत यांना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली. पण, एबी फॉर्म मनोज सांगोळे यांना दिला आहे. त्यामुळे या दोन उमेदवारांत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.