यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याने येथील शेतकरी कायम नैराश्याच्या गर्तेत असतात, याबाबत शासन, प्रशासन अद्यापही ठाम आहे. त्यामुळेच आता नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘मन:शक्ती’ क्लिनिक उघडण्यात येणार आहे.
जिल्हा शल्यचिकीत्सक कार्यालयाच्या वतीने मानसिक आरोग्य कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यातून जिल्ह्यातील नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना मानसिकरित्या अधिक कणखर बनिवण्यासाठी जिल्ह्यातील ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रात मन:शक्ती क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे.
हेही वाचा – नागपूर : सरकारविरोधात राष्ट्रीय आदिम कृती समितीकडून निदर्शने, हलबा समाजावर अन्यायचा आरोप
सततची नापिकी, मुलांचे शिक्षण, आई-वडिलांचे आजारपण, कौटुंबिक गरजा पूर्ण करताना येणारा ताण आदी कारणांमुळे शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचत असल्याचा निष्कर्ष शासनाने विविध सर्वेक्षणांती काढला आहे. विविध कारणांनी आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करतात. शेतकऱ्यांना या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी पूर्वी ‘प्रेरणा प्रकल्प’ राबविण्यात येत होता. पूर्वी शेतकऱ्यांच्या मानसिक स्थितीचे सातत्याने सर्वेक्षण करण्यात येत होते. मात्र, कोविड काळात ही प्रकिया थांबली. त्यामुळे आता या प्रकल्पाची व्यापकता वाढवत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात चार लाख ७३ हजार ४७० शेतकरी कुटुंब संख्या आहे. आशा वर्कर घरोघरी जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेत आहे. एक, दोन व तीन, असे नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात येत आहे. अतिजोखीम असणाऱ्या शेतकऱ्यांवर मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करण्यात येणार आहे. येत्या जानेवारी २०२४ मध्ये सोळाही तालुक्यात शिबीर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पूर्वी केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच मानसिक उपचार केले जात होते. आता जिल्हा स्त्री रुग्णालयात दर गुरुवारी बाह्यरुग्ण विभागात समुपदेशनासह उपचार करण्यात येतात.
हेही वाचा – ‘तेज’ चक्रीवादळ आज अधिक सक्रिय होणार, महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीला धोका नाही
उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातही उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू होणाऱ्या मन:शक्ती क्लिनिकसाठी डॉक्टर व परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. व्यक्ती नैराश्येत असल्याने त्याच्या वागणुकीत होणारा बदल हा कुटुंबातील सदस्यांना दिसतो. मात्र, संबंधित व्यक्तीला रुग्णालयात जाण्याची भीती वाटते. त्यावर पर्याय म्हणून संवाद साधण्यासाठी १४४१६ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आश्रमशाळांत विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना काही विद्यार्थ्यांना प्रकाश नकोसा वाटत असल्याचे लक्षात आले. त्यांना अंधारात राहणेच आवडत होते. त्यामुळे त्यांना फोटो फोबिया असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. फोटो फोबियामुळे एका विद्यार्थिनीवर एमबीबीएस शिक्षण सोडण्याची वेळदेखील आली आहे. त्यामुळे प्रांरभी जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांवरदेखील या आजारसाठी मानसोपचार तज्ज्ञांद्वारे उपचार केले जाणार आहेत.