अकोला: गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवात निलेश देव मित्र मंडळ व ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्यावतीने रथ कार्यान्वित करून निर्माल्य संकलन करण्यात आले. यात पाच टन निर्माल्य आले. या निर्माल्यापासून खत आणि धुपबत्ती तयार केली जाणार आहे.
उत्सव काळात मोठ्या प्रमाणात फुले आणि झाडांच्या पाने देवाला वाहिली जातात. उत्सव संपुष्टात आल्यानंतर निर्माल्य नदीत टाकल्या जाते. परिणामी नदी प्रदूषित होते. विशेषत: गणेशोत्सव, हरतालिका, नवरात्र, दसरा आदी उत्सवात मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होते. ही बाब लक्षात घेऊनच दरवर्षी उत्सव काळात निर्माल्य संकलन रथाद्वारे निर्माल्य संकलन केले जाते. गणेशोत्सवानंतरही या निर्माल्य रथाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात फिरुन निर्माल्य संकलित केले.
हेही वाचा… मराठा आरक्षणाची धग वाशिमपर्यंत, ‘या’ गावात नेत्यांना प्रवेश बंदी; आधी कॅन्डल मार्च आता साखळी उपोषण
बुधवार दि.२५ ऑक्टोंबर रोजी अशोक वाटिकेसह शहराच्या विविध भागात फिरुन निर्माल्य संकलन करण्यात आले. यावेळी पाच टन निर्माल्य संकलित झाले. या निर्माल्यापासून खत आणि धुपबत्ती तयार केली जाणार आहे. निर्माल्यावर प्रक्रिया करण्याचे काम ४ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येईल. हे खत शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे, अशी माहिती निलेश देव यांनी दिली.