वर्धा : शालेय पातळीवर मोठ्या प्रमाणात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे असतात. शिक्षक सोडून भरल्या जाणाऱ्या ही पदे विविध कामांसाठी उपयुक्त ठरतात. मात्र अनेक वर्षांपासून ही पदे भरल्या गेली नव्हती. त्यास आज हिरवा कंदील देण्यात आला आहे.शालेय शिक्षण विभागाने तसा आदेश जारी केला. राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत: व पूर्ण अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी बाबत हा निर्णय आहे. त्यांच्या नियुक्ती व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक यासारखी पदे मंजूर करण्यात आली आहे.
ही पदे अनुकंपा तत्ववरील नियुक्त्यासह भरल्या जाणार. तसेच १०० टक्के नामनिर्देशन पद्धतीने भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. खाजगी मान्यताप्राप्त शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या वारसास अनुकंपा तत्ववार नियुक्ती देण्याबाबतच्या तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत. सदर पदे १०० टक्के सरळसेवेने भरतांना यात अनुकंपा नियुक्ती पण असणार.आतापर्यंत शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदभरती होत होती. यापुढे ती होणार नाही. अशी पदे आता व्यपगत करण्यात आली आहे. त्या ऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे. मात्र या आजच्या निर्णयापूर्वीपासून नियमित नियुक्तीने कार्यरत असलेले कर्मचारी हे त्यांच्या सेवा निवृत्तीपर्यंत कार्यरत राहतील. मुख्य लिपिक व वरिष्ठ लिपिक ही पदे पदोन्नतीनेच भरल्या जाणार.
सरळसेवेने १०० टक्के पदे भरण्याबाबतची बिंदू नामावली नोंदवही प्रमाणित करतांना एक दक्षता अपेक्षित. संबंधित अधिकाऱ्याकडे ही नोंदवही प्रमाणित करण्यास सादर करतांना चतुर्थ श्रेणी संवर्गात कोणताही कर्मचारी कार्यरत नाही अथवा कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यापैकी कोणताही कर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत नाही, पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी ईच्छुक नाही, अशा आशयचे प्रमाणपत्र बिंदू नामावली नोंदवहीसोबत सादर करणे आवश्यक ठरणार आहे.
विदर्भ मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य सतीश जगताप यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की ही पदभरती आवश्यक होती. २०१९च्या संच मान्यतेनुसार ही पदभरती होईल. बऱ्याच जागा रिक्त झाल्याने व नवी भरती होत नसल्याने शाळेतील बहुतांश कामांची जबाबदारी शिक्षक वर्गावर आली होती. परिणामी अध्यापन कार्य विस्कळीत होत होते. आता भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने दिलासा मिळणार.