लोकसत्ता टीम

यवतमाळ : उमरखेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या दोन माजी आमदारांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. शनिवारी उमरखेड येथे हा पक्ष सोहळा पार पडला. विधानसभा निवडणुकीतील तिकीट वाटपापासून काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस सुरू होती. या नाराज नेत्यांना भाजपने आज पक्षात प्रवेश दिला. भाजपचे जिल्हा समनव्यक नितीन भुतडा यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश करीत असल्याचे यावेळी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी सांगितले.

काँग्रेसमध्ये गळचेपी

काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांकडून होणाऱ्या गळचेपीमुळे व्यथित होवून पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे माजी आमदार विजय खडसे यांनी सांगितले. याचसोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश चव्हाण यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेतृत्व देईल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडू, अशी ग्वाही यावेळी तिन्ही नेत्यांनी दिली. पद नको, सन्मान द्या. अशी मागणी करत, आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायती, जिल्हा परिषद यासह सहकारी क्षेत्रातील सर्व निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकू, असा विश्वास यावेळी दोन्ही माजी आमदारांनी व्यक्त केला.

भाजपमध्ये येणाऱ्यांना सन्मान मिळेल

पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांनाच सन्मानजनक वागणूक मिळेल, असे बावनकुळे यांनी सांगितले. उमरखेडचे आमदार किसन वानखेडे यांनी उमरखेड तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रदेशशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे गळ घातली. या समस्या सोडविण्याची ग्वाही बावनकुळे यांनी दिली.

यावेळी आमदार संजय कुटे, भाजप जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, समन्वयक नितीन भुतडा, माजी आमदार उत्तमराव इंगळे, नामदेव ससाने, आरती फुपाटे, सुदर्शन रावते, महेश काळेश्वरकर आदी उपस्थित होते. आज माजी आमदारांसह माजी सभापती कृष्णा पाटील देवसरकर, माजी नगराध्यक्षा भावना उदावंत, बालाजी उदावंत, रमन रावते, बाळु सेठ भट्टड, विजय हरडफकर, किशोर वानखेडे, साहेबराव कदम हिवरेकर, जगदीश नरवाडे, माधव वैध, रमेश आडे आदींनी भाजपा प्रवेश घेतला.

Story img Loader