अमरावती : वाहतुकदारांच्या संपामुळे पेट्रोल पंप बंद राहणार नसल्याचे पेट्रोल-डिझेल असोसिएशनने स्पष्ट केले असले, तरी शहरातील पेट्रोल पंपांवर सोमवारी सायंकाळपासून प्रचंड गर्दी उसळल्याने शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवरील इंधन संपले. ज्या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहे, त्या ठिकाणी वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा पसरली आणि नागरिकांनी थेट पेट्रोल पंपांकडे घेतली. आपल्या वाहनांमध्ये इंधन भरुन घेण्यासाठी पंपावर मोठी गर्दी उसळली. काहींनी गरजेपेक्षा जास्त इंधन वाहनातून भरून घेतल्याने काही पंपांवरील इंधन संपले, अशी माहिती पेट्रोल पंप चालकांनी दिली.
हेही वाचा >>> सव्वा किलो सोन्या-चांदीचे दागिने जप्त; कर्मचार्यांनीच केली सराफाकडे चोरी
सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्या विरोधात ट्रक चालकांच्या आंदोलनाचा परिणाम दिसून आला. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि युनायटेड फ्रंड राष्ट्रीय मोर्चा या देशातील दोन मोठ्या ट्रान्सपोर्ट संघटनाच्या बॅनरखाली ट्रान्सपोर्टर, ट्रक चालक-मालकांनी देशव्यापी संप पुकारला आहे. यात जिल्ह्यातील सात हजार ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, पाचशे पेट्रोल-डिझेल टँकर चालक-मालक यासह १६० मालधक्का ट्रक चालक-मालकांचा समावेश आहे. तसेच या संपात प्रमुख सात वाहन चालक-मालक संघटना सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे जागोजागी ट्रक, टँकर व अन्य वाहनांची चाके थांबलेली आहेत. अमरावती विभागातून आंतरराज्य वाहतुक करणाऱ्या एसटी महामंडळाच्या १० फेऱ्यांची वाहतुक यामुळे खोळंबली असून डिझेल उपलब्ध न झाल्यास एसटी बस वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.