लोकसत्ता टीम
नागपूर : राज्यातील बऱ्याच भागात पावसाचा जोर कायम असल्याने विजेची मागणी २० हजार मेगावॅटहून कमी नोंदवली गेली. त्यामुळे महानिर्मितीसह इतर काही खासगी कंपन्यांना वीजनिर्मिती बंद करावी लागली.
राज्यातील बहुतांश भागात पाऊस असल्याने वातानुकूलित यंत्र, कुलर, पंखे, कृषी पंपासह विद्युत उपकरणांचा वापर कमी झाला आहे. ३० जुलैच्या दुपारी १.३० वाजता राज्यात विजेची मागणी १९ हजार ८३२ मेगावॅटपर्यंत खाली आली. त्यापैकी ३ हजार २५२ मेगावॅट मागणी मुंबईची तर इतर मागणी राज्यभरातील होती. एकूण मागणीपैकी १३ हजार २६८ मेगावॅट वीजनिर्मिती राज्यात होत होती.
आणखी वाचा-भाजप आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डने स्वतःवर झाडली गोळी
राज्यात सर्वाधिक ४ हजार ६७१ मेगावॅट वीजनिर्मिती महानिर्मितीकडून झाली. त्यात औष्णिक विद्युत प्रकल्पातून ४ हजार २५१ मेगावॅट, उरण गॅस प्रकल्पातून ८६ मेगावॅट, जलविद्युत प्रकल्पातून २६८ मेगावॅट, सौर ऊर्जाप्रकल्पातून ६३ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली. खासगी प्रकल्पांपैकी अदानीकडून १ हजार ४५२ मेगावॅट, जिंदलकडून ७४६ मेगावॅट, आयडियलकडून १७४ मेगावॅट, रतन इंडियाकडून ४६४ मेगावॅट, एसडब्ल्यूपीजीएलकडून ३४७ मेगावॅट वीजनिर्मिती झाली. केंद्राच्या वाट्यातूनही राज्याला ६ हजार ७११ मेगावॅट वीज मिळाली. दरम्यान, या वृत्ताला महावितरण व महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला. मागणी वाढताच तातडीने गरजेनुसार वीज उपलब्ध करण्यासाठी कंपन्या सज्ज असल्याचा दावाही त्यांनी केला.
एप्रिल महिन्यात सर्वोच्च मागणीची नोंद
महावितरणकडून यंदाच्या उन्हाळ्यात १७ एप्रिल २०२४ रोजी सर्वाधिक २५ हजार ६८ मेगावॅट विजेची मागणी नोंदवली गेली. तर २७ फेब्रुवारीला २५ हजार २३ मेगावॅट, २७ मार्चला २५ हजार ३५ मेगावॅट, १९ एप्रिलला २४ हजार ८०५ मेगावॅट, २२ मे रोजी २४ हजार ६०४ मेगावॅट, ३ जूनला २४ हजार ४४३ मेगावॅट विजेची मागणी नोंदवली गेली. परंतु मागील काही दिवसांत ही मागणी कमी झाली आहे.
आणखी वाचा-अमरावती : ‘विदेशी नोटा भारतीय चलनात बदलून देता का?’ आंतरराज्यीय टोळीतील तीन महिला…
वीजेची मागणी कमी होण्याची कारण?
राज्यातील बऱ्याच भागात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अनेक भागात नदी- नाल्यातील पाण्याची पातळी वाढली आहे. तर धरण, तलावातही पाण्याचा साठा वाढला आहे. पावसामुळे तापमाण घसरल्याने वातानुकूलित यंत्र, कुलरसह विद्युत उपकरणांचा वापर कमी झाला असून कृषीपंपाचाही वापर बंद असल्याने वीजेच्या मागणीत घट झाली आहे.
जुनच्या दुसऱ्या आठवड्यात २३,२६४ मेगावॅट मागणी
राज्यात १० जून २०२४ रोजी दुपारी २.१० वाजता वीजेची मागणी २३ हजार २६४ मेगावॅट नोंदवली गेली. त्यात महावितरणच्या १९ हजार ८४० मेगावॅट तर मुंबईच्या ३ हजार ४२५ मेगावॅट मागणीचा समावेश होता. परंतु आताही मागणी बघता त्यात मोठी घट झाली आहे.