अमरावती : उमेदवारी अर्ज मागे घेण्‍याच्‍या अखेरच्‍या दिवशी अनेक बंडखोरांनी आपल्‍या तलवारी म्‍यान केल्‍या. परंतु, बडनेरा, अमरावती, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी मतदारसंघांमधील सात बंडखोर निवडणुकीच्‍या रणांगणात कायम आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्‍ह्यातील बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्‍याचे मोठे आव्‍हान महायुती आणि महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांसमोर होते. वरिष्‍ठ नेत्‍यांनी पक्षाच्‍या बंडखोर उमेदवारांना शांत करण्‍याचा सर्वोतोपरी प्रयत्‍न केला. यात काही ठिकाणी यश आले, पण अनेक उमेदवार बंडखोरीच्‍या निर्णयावर ठाम राहिले. अचलपूर मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार नंदकिशोर वासनकर, अक्षरा लहाने यांच्‍यासह ८ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्‍यामुळे आता या ठिकाणी २२ उमेदवार रिंगणात आहेत. तरीही भाजपसमोरील संकट पूर्णपणे टळू शकले नाही. भाजपचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष आणि बंडखोर उमेदवार ठाकूर प्रमोदसिंह गड्रेल यांनी लढत देण्‍याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा…बापाने मुलावर गोळी झाडली, तरीही न्यायालयाकडून हत्येचा गुन्हा रद्द… कारण,…

u

मेळघाटमधील भाजपचे बंडखोर उमेदवार माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्‍यासह ९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. मात्र भाजपच्‍या अन्‍य बंडखोर उमेदवार ज्‍योती सोळंके यांनी माघार न घेतल्‍याने भाजपसमोरील अडचणी कायम आहेत. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मन्‍ना दारसिंबे यांनी उमेदवारी मागे घेतल्‍याने महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे.

अमरावतीत ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मात्र भाजपचे बंडखोर उमेदवार माजी पालकमंत्री जगदीश गुप्‍ता हे लढतीत कायम आहेत. बडनेरा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्‍ही आघाड्यांमध्‍ये बंडखोरी झाली आहे. युवा स्‍वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांच्‍या विरोधात भाजपचे बंडखोर तुषार भारतीय आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार सुनील खराटे यांच्‍या विरोधात प्रीती बंड लढतीत कायम आहेत. दर्यापूरमध्‍ये महायुतीतील फूट कायम आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे अभिजीत अडसूळ यांच्‍या विरोधात भाजपचे बंडखोर आमदार रमेश बुंदिले युवा स्‍वाभिमान पक्षातर्फे लढत आहेत. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार गुणवंत देवपारे, रामेश्‍वर अभ्‍यंकर यांनी माघार घेतल्‍याने महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा…वंचितला मोठा धक्का…अधिकृत उमेदवाराची माघार…आता काँग्रेसला…

मोर्शीतून भाजपचे बंडखोर उमेदवार डॉ. मनोहर आंडे, राजेंद्र आंडे, श्रीधर सोलव, अमित कुबडे यांनी माघार घेतली आहे, मात्र राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) बंडखोर विक्रम ठाकरे रिंगणात आहेत. जिल्‍ह्यात एकूण २४८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते, त्‍यापैकी ८८ जणांनी माघार घेतल्‍याने १६० उमेदवार लढतीत कायम आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many rebels sheathed their swords on last day of withdrawal of nomination papers mma 73 sud 02