नागपूर: हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक ड्रायव्हर्स रस्त्यावर उतरले आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वाहन चालकांसह युनीयने नागपूरसह अन्य ठिकाणी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली आहे.
या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना देखील बसला आहे. ख्रिसमसच्या सुट्टीनंतर मंगळवारपासून शाळांना सुरुवात होणार होती. मात्र चालकांचा संप असल्याने शहरातील अनेक शाळांनी आज परस्पर सुट्टी जाहीर केली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ट्रान्सपोर्ट युनियनने सुरू केलेल्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. संपामुळे अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून ने आण करण्यासाठी असलेल्या स्कूलबस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतला आहे. ख्रिसमस सुट्ट्यानंतर शाळा आज सुरू होणार होत्या. मात्र सकाळीच पालकांना संदेश पाठवून शाळेला सुट्टी देण्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा… सव्वा किलो सोन्या-चांदीचे दागिने जप्त; कर्मचार्यांनीच केली सराफाकडे चोरी
अनेक खासगी शाळांमधील विद्यार्थी हे स्कुल बस ने शाळेत येतात. ९० टक्के विद्यार्थी हे स्कुल बसवर अवलंबून असतात. मात्र कालपासून सुरू झालेल्या संपाला आता स्कुल बस चालकांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सर्व शाळांच्या बस ठप्प पडल्याने काही शाळांनी परस्पर सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय सरकारी शाळा सुरू असल्या तरी खासगी वाहनाने शाळेत जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तर बस व अन्य वाहतुकीची साधने बंद असल्याने जाणाऱ्यांची अडचण झाली आहे.