वर्धा : राज्यातील प्रत्येक विद्यार्थी नोंदणी झालेला असावा. म्हणजेच त्याचे आधारकार्ड शाळा प्रवेशाशी जोडलेले असले पाहिजे, असा शिक्षण विभागाचा ध्यास आहे. सर्व ते प्रयत्न झाले. मात्र अद्याप राज्यातील अनेक विद्यार्थी नोंदणीत आलेले नाही. नोंदणी नाही म्हणून योजनांचा लाभ देता येत नाही ही अडचण. ती लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकारी आता कामाला लागले आहे.

राज्यातील सर्व विभाग, सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ही सूचना. इयत्ता पहिली ते बारावी यात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे यू डायस व सरल पोर्टलमधील स्टुडंट पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. मात्र राज्यातील अद्याप ५. २८ टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नाही. ही बाब दखलपत्र आहे.

ही उर्वरित नोंदणी झालीच पाहिजे, असा शिक्षण खात्याचा प्रयत्न आहे. म्हणून नोंदणी मुदत १४ एप्रिल पर्यंत वाढवून देण्याचा निर्णय झाला. आतापर्यंत राज्यात ९४. ७२ टक्के विदयार्थ्यांचे आधार नोंद प्रामाणित झाले आहे. म्हणजेच १०० टक्के नोंदणी कार्य झालेले नाही. म्हणून उर्वरित विद्यार्थी नोंदणीत आले पाहिजे, असा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी शाळा, केंद्र व तालुका पातळीवार नियोजन आवश्यक झाल्याचे मत आहे.

हे काम तत्पर पूर्ण व्हावे म्हणून तालुका स्तरावर काही शाळा मिळून एक अधिकारी नेमावा. त्यासाठी प्रत्येक शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचे आधार प्रामाणित झालेले नाही, त्या विद्यार्थ्यांचे नाव व त्यामागचे कारण याची यादी शाळांनी तयार करायची आहे, अशी कारणे शोधून उर्वरित विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक, केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी यांची मदत घेत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यासाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकऱ्याने आठवड्यातून किमान दोनदा या कामाचा आढावा घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी गट शिक्षणाधिकारी यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन आढावा बैठकीत भाग घ्यावा. त्यात अडचणी निराकरण करावे. किमान एक अशी बैठक आठवड्यात व्हावी.

हे कार्य करण्यासाठी १५ एप्रिल पर्यंत विशेष मोहीम अपेक्षित. प्रत्येक शाळेतील शिल्लक असलेल्या विद्यार्थी निहाय नोंद तपासणे क्रमप्राप्त ठरते. तरच १०० टक्के आधार प्रामाणित नोंदणी पूर्ण होणार. तसेच आधार प्रामाणित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची अपार आयडीची पण कार्यवाही पण पूर्ण करण्याची सूचना आहे. शिक्षण आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे की नमूद बाबींची अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांचे आधार नोंद करीत ते सर्व आधार प्रमाणित होतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे.