Ashok Chavan Speech in Nagpur : काँग्रेस स्थापना दिनानिमित्त नागपुरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राहुल गांधींसह काँग्रेसमधील अनेक महत्त्वाचे आणि वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपावर घणाघात केला. अनेकांनी काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला, असंही चव्हाण म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीच्या निमित्ताने देशाला एकतेचा संदेश द्यायचा आहे. गेल्या १० वर्षांत राज्याचं आणि देशाचं नुकसान झालं आहे. हे लक्षात ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे. या देशाला गुलामीपासून वाचवायचं आहे. संसद बंद होते. संसदेत कोणालाही बोलू दिलं जात नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार अत्याचार वाढत असताना त्यावर कोणीही बोलत नाही. डबल इंजिन सरकार देशासाठी कुठे कामाला आली आहे? असा सवाल अशोक चव्हाणांनी विचारला.

हेही वाचा >> “…तेव्हापासून नरेंद्र मोदींचं भाषण बदललं”, राहुल गांधींचा टोला; म्हणाले, “आधी ते स्वत:ला…!”

देशाची १० वर्षे खराब केली

“लोकांचं मतं बाजूला करून देशाला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही. महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी यांचा फायदा होत नाही. देशाचे १० वर्षे खराब झाले आहेत. देशाला निवडणुकीच्या जुमल्यात फसवलं गेलं. देशाला काँग्रेसुक्त करण्याचा त्यांचा डाव होता. काँग्रेसला अनेक लोकांनी संपवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस संपली नाही. काँग्रेसला संपवणारे लोक संपले पण काँग्रेस संपली नाही”, असाही घणाघात चव्हाणांनी केला.

हेही वाचा >> “महाराष्ट्रातील कार्यकर्ते माझ्यासाठी स्पेशल, कारण…”, राहुल गांधींनी सांगितलं काँग्रेस-महाराष्ट्राचं नातं!

सूर्य बनकर वहीं निकलता है

“लोकांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचाराविरोधात चोख प्रत्युत्तर दिलं नाही तर पुढचे पाच वर्षे देशाची राखरांगोळी पाहण्याची वेळ येणार आहे. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. शिद्दत से जो संघर्ष करता है, सूर्य बनकर वहीं निकलता है” अशा काव्यात्मक पंक्तीत चव्हाणांनी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना स्फुरण चढवलं.

हेही वाचा >> काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचे मराठीत भाषण; पंतप्रधान मोदी, भाजपा सरकारविरोधात जोरदार टीका

समाजा-समाजात वाद लावण्याचे प्रयत्न

“या सर्व पार्श्वभूमीवर जे विषय आहेत त्याला सामोरं जावं लागेल. हुकूमशाहीसमोर देशातील लोकशाही दाबण्याचा प्रयत्न होतोय. देशात संविधानाचं रक्षण करण्याकरता आपण सर्वांनी एकजुटीने लोकशाही मजबूत करण्याचं काम आगामी होणाऱ्या लोकसभेच्या माध्यमातून, विधानसभेच्या निवडणुकीतून करावं लागणार आहे. महाराष्ट्रात समाज-समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा-ओबीसी, एसटी विरुद्ध एसटी असा वाद आहे. हे जे सुरू आहे ते आपले मूळ विषय बाजूला राखून समाजा-समाजात वाद लावून पुन्हा महाराष्ट्राची सत्ता काबिज करण्याकरता सगळी वाटणी करण्याचं काम सुरू आहे. आपल्या सर्व समाजाला न्याय द्यायचा असेल तर जातिनिहाय जनगणना केली पाहिजे”, असंही चव्हाण म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many tried to end the congress but ashok chavan criticized the rulers sgk