वर्धा : व्यायामाचे अलीकडे तरुणाईस चांगलेच वेड लागले आहे. सिक्स पॅक बॉडी आता परवलीचा शब्द ठरत आहे. नटांचे पिळदार शरीर या तरुणांसाठी आकर्षण ठरत आहे. म्हणूनच शरीर सौष्ठव स्पर्धाचे प्रमाण वाढत असून त्यात सहभागी होणारे पण वाढतच आहेत. वर्ध्यात आयोजित या अश्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात युवक सहभागी झालेत. त्यात काही अव्वल आलेत. त्यांना एका समारंभात पुरस्कार प्रदान झाले.
जिल्हा क्रीडा संकुलच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन युवक एकता क्रीडा मंडळातर्फे करण्यात आले होते. स्पर्धेत ५५ किलो गटात सकूर शेख, निकेश मडावी, रिहान अली, सुगत माहुरे सोनबा सेलाम यांना अनुक्रमे प्रथम पाच पुरस्कार प्राप्त झाले. ६० किलो गटात अमर ठाकरे, नयन मुगल, हर्ष चौधरी, स्वप्नील पखाडे, नीलेश कंगले. ६५ किलो गटात सौरभ वरठी, वैभव येलेकर, रियाझ शहा, धीरज थूल, सुरज मसराम. ७० किलो गटात मोहित कुराडकर, ओम बडवाईक, रितिक गजभिये, शेख इहेतेराम, गिरीराज उपाध्याय. ७५ किलो गटात पंकज ढाकुळकर, महेश शेडमाके, तेजस कडुकर, फीजन शेख व मोहम्मद सोहिल सलीम. या स्पर्धेस मिळालेला प्रतिसाद पाहून गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढील वर्षीपासून या स्पर्धा विदर्भ पातळीवर घेण्याची घोषणा केली. अश्या स्पर्धाचे आयोजन होणे ही आरोग्य संदेश देणारी बाब ठरते असे ते म्हणाले.
हेही वाचा…धक्कादायक… नागपुरात ‘एचएमपीव्ही’चे रुग्ण… आता आयसीएमआर…
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर कुणावार व राजेश बकाने, बडनेरा येथील आमदार रवी राणा, माजी खासदार रामदास तडस, मल्हार फेम अभिनेता देवदत्त नागे, सुरेश वाघमारे, अजय मोहिते, नीलेश किटे, प्रशांत बुरले प्रामुख्याने उपस्थित होते. स्पर्धेत सौरभ नारायण वरठी यांस चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, गजानन ढाकूळकरला बेस्ट पोजर, अमर ठाकरे यांस बेस्ट मस्क्युलर म्हणून गौरविण्यात आले. महसूल मंत्री बावनकुळे यांनी या स्पर्धा आयोजनाचे कौतुक केले. ते म्हणाले की राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा उपक्रम आता राज्यभर राबवून सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली देण्याचा प्रयत्न केल्या जाईल. या स्पर्धाच्या माध्यमातून एक सुदृढ पिढी घडत असल्याचे ते म्हणाले.आयोजनात महेश वसु, डॉ. मदन इंगळे, अजय वरटकर, निशू हरबुडे, डॉ. शशांक निकम, आशिष काळमेघ, गोलू जगताप, नौशाद शेख आदिनी योगदान दिले.