लोकसत्ता टीम
नागपूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने काँग्रेसला मदत केली. आमच्या मतांवर यांचे अनेक खासदार निवडून आले. परंतु, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना केवळ ओबीसी समाजाचीच काळजी आहे असे दिसून येते.
मराठा आरक्षणसाठी आतापर्यंत २०० युवकांनी आत्महत्या केल्या. परंतु, त्यांच्या सहानुभूतीसाठी वडेट्टीवारांनी कधी शब्दही काढला नाही. किंवा त्यांच्या परिवाराची भेट घेतली नाही. उलट ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी भेट देत अश्रू काढून मराठा विरोधी चिथापनी देत आहेत. विरोधी पक्षनेते हे कुठल्या एका पक्षाचे नसतात. त्यामुळे अशा जातीयवादी विरोधी पक्षनेत्याची काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली. अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी नागपूर येथे पार पडली. यावेळी विविध ठराव घेण्यात आले. त्याची माहिती राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आणखी वाचा-धक्कादायक! मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी जलपर्यटना दरम्यान माध्यम प्रतिनिधींची बोट उलटली
आरक्षणाच्या विषयावर मराठा व ओबीसी असा विनाकारण वाद निर्माण करून फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील वातावरण दूषित केले जात आहे. त्यामुळे राज्याच्या पावसाठी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहात आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव घेऊन तो केंद्र सरकारकडे पाठवावा. तसेच राज्यातील ४८ खासदारांनी संसदेमध्ये यावर चर्चा घडवून आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी लावून धरावी, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाने केले. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, त्यांची ‘सगेसोयरे’ची मागणी पूर्ण होणे शक्य वाटत नाही. तसेच राज्य शासनाने सध्या दिलेले १० टक्के आरक्षणही न्यायालयात टीकण्याची शक्यता कमी आहे.
देशात आज मराठा समाजासह जाट, पटेल, गुर्जर असे सर्व समूदाय आरक्षणासाठी लढत आहेत. त्यामुळे आरक्षण द्यायचे असेल तर घटनादुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवणे आवश्यक आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण दिल्यास कुणीही दुखावले जाणार नाही. त्यासाठी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव घेऊन सर्व पक्षाच्या शिष्टमंडळाने तो केंद्र सरकारकडे सादर करावा. तसेच ४८ खासदारांनीही हा प्रश्न संसदेत मांडावा अशी मागणी दहातोंडे यांनी केली.
आणखी वाचा-भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध, काँग्रेसने दाखवले काळे झेंडे
आरक्षण देण्याचे धाडस फडणवीसांनी दाखवले
राज्यात आतापर्यंत मराठा समाजाचे नऊ मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांनी समाजाला आरक्षण देण्याचे धाडस केले नाही. ते धाडस मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘सारथी’सारखी संस्था उभी केल्यामुळे आज मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे बैठकीत फडणवीसांच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आल्याची माहिती दहातोंडे यांनी दिली.