वाशिम: जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचे तीव्र पडसाद वाशीममध्ये उमटले. आज दुपारी अकोला- नांदेड महामार्गावर जिजाऊ चौक येथे मराठा क्रांती मोर्चाने रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा दो, राज्य सरकार हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या.
जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे शांततेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. मात्र पोलिसांनी आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर लाठीचार्ज केला, असा आरोप करीत या घटनेचे तीव्र पडसाद वाशीम जिल्ह्यात उमटले. जिजाऊ चौक येथे मराठा क्रांती मोर्चा कडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा… हे शासन नको दारी, यांना पाठविणार घरी! चंद्रशेखर बावनकुळे यांना काळे झेंडे दाखवण्याच्या…
फडणवीस यांनी राजीनामा द्यावा व दोषी पोलीस अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी, यासह विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. रास्ता रोको मुळे काहीकाळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.