लोकसत्ता टीम
चिखली: भाजपच्या एका कार्यक्रमानिमित्त चिखली येथे येत असलेले भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना चिखली पोलिसांनी स्थानबद्ध केले. यामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला.
चिखली पोलिसांनी सकल मराठा समाजाच्या मोर्चाच्या कार्यकर्त्यांना काळे झेंडे दाखविण्या अगोदरच ताब्यात घेतले. त्यामुळे प्रक्षुब्ध कार्यकर्त्यांनी शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.पोलिसांनी कपिल खेडेकर, डॉ. शिवशंकर खेडेकर, प्रशांत देशमुख, डॉ. सत्येंद्र भुसारी, दीपक लहाने, कृष्णा जाधव, निलय देशमुख तांगडे , बंडू नेमाने, पुंजाजी शेळके आदींना ताब्यात घेतले. यावेळी कपिल खेडेकर यांनी माध्यमाशी बोलताना शासन नको आता आमच्या दारी, जनता यांना पाठवणार घरी असे ठणकावून सांगितले.
आणखी वाचा-“गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या,” मराठा समाजाची मागणी; मोताळ्यात रास्ता रोको
जालना जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन दडपून टाकण्यासाठी शासनाच्या आदेशानेच पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्याचा आरोपही खेडेकर यांनी केला.