जालना : मराठा समाजाने आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा डाव मोडून काढला आहे. सर्वच जिल्ह्यात नोंदी सापडत आहेत. त्यामुळे ४० टक्के लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहे. मराठा आरक्षणासाठी मागील ७५ वर्षांत कोणी काय केले हे २४ डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार असल्याचे, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, या दरम्यान १५ नोव्हेंबरपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी म्हणजेच बुधवारी सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ या ठिकाणी जरांगेंची भव्य सभा होणार आहे. ही सभा १२५ एकर शेतात होणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने या सभेची तयारी करण्यात येत आहे.
रुग्णालयातुन सुट्टी होताच जरांगे आंतरवाली सराटीत पोहचले.
उद्यापासून त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, मागील ७५ वर्षांत कोणी काय केले हे २४ डिसेंबरनंतर आम्ही समाजाच्या पुढे मांडणार आहोत. त्यातून सुट्टी होणार नाही. कोणी काय केले हे आम्ही काढून ठेवत आहोत. सध्या आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला द्यावे, हीच भूमिका आमची राहणार असल्याचे जरांगे म्हणाले.
हेही वाचा >>> महिलेवर बलात्कार करून खून! समृद्धी महामार्गावरील घटना; अज्ञाताविरोधात गुन्हा
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात वांगी नंबर १ या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची तोफ धडाडणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील एक लाख मराठा बांधव या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. तब्बल १२५ एकर शेतात होणाऱ्या या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. सभेच्या ठिकाणी येणाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची, रुग्णवाहिका आणि डॉक्टर यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
उजनी जलाशयाच्या नैसर्गिक सान्निध्यात आयोजित करण्यात आलेली ही सभा संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. तर, उद्या होणाऱ्या या सभेची सकल मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांकडून आणि आयोजकांकडून मंगळवारी पाहणी करण्यात आली.
कोणावर तोफ डागणार?
मनोज जरांगे यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सभेत सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर मागील काही दिवसात जरांगे यांच्याकडून ओबीसी नेत्यांवर देखील टीका केली जात आहे. विशेष करून मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जरांगेंच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील या सभेतून जरांगे आता कुणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.