नागपूर: जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणा-यांवर १ सप्टेंबरला झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ गुरूवारी नागपुरात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गणेशपेठ बस आगारापुढे टायर पेटवून आंदोलकांनी एसटी रोखल्याने तणाव निर्माण झाला होता.
‘एक मराठा- लाख मराठा’, ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ असे नारे देत सुमारे २५ ते ३० आंदोलक एसटीच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक बाहेर गुरूवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास आले. त्यांच्या हाती चक्काजाम व रस्ता रोको असे लिहिलेले फलक होते. त्यापैकी काहींनी अचानक पाच ते सहा टायर बसस्थानकाच्या बाहेर बसच्या मार्गावर आणून टाकले आणि ते पेटवून दिले. दुसरीकडे आंदोलकांनी आगारातील बाहेर जाण्यासाठी द्वारावर आलेल्या बसही रोखल्या.
हेही वाचा >>> फडणवीस यांच्याकडेच आरक्षण देण्याची नियत; अन्य नेत्यांकडून केवळ राजकारण – शिवेंद्रराजे
परिसरात तणाव निर्माण झाला होता. तातडीने एसटी प्रशासनाने वाहतूक पोलीसांसह गणेशपेठ पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रथम आगीवर नियंत्रण मिळवले. पोलिस आल्याचे बघत आंदोलक निघून गेले. सुदैवाने संतप्त आंदोलक आगाराच्या आत गेले नसल्याने एसटीचे नुकसान झाले नाही. परंतु या घटनेमुळे एसटीचे परिचालन सुमारे अर्धातास विस्कळीत झाले होते. परंतु महामंडळाने केवळ ५ ते १० मिनटेच परिचालन प्रभावीत झाल्याचे स्पष्ट केले. आंदोलनानंतर बसेस त्यांच्या नियोजित स्थळी रवाना झाल्या,असा दावा केला.