लोकसत्ता टीम
बुलढाणा : मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणामुळे जालना जिल्ह्याला लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भागातील समाज बांधवांच्या भावना तीव्र आहे. यामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी गावातील राहिवासीयांनी देखील नेत्यांना आजपासून गावबंदी लागू केली आहे. गावबंदी लागू करणारे जिल्ह्यातील प्रथम गाव ठरणाऱ्या या गावाच्या प्रवेशद्वारावर तसे फलक लावण्यात आले.
जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले त्यांच्या समर्थनार्थ राहेरी बुद्रुक ग्रामस्थांनीही रोखठोक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला जोवर आरक्षण मिळत नाही तोवर आमदार, खासदार तसेच पुढारी लोकांना गावबंदीचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. आज २७ ऑक्टोबर रोजी गावाच्या प्रवेशद्वारावर बंदीचे फलक झळकाण्यात आले.यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी परिसर दणाणला.
आणखी वाचा-आमच्याकडे येणाऱ्यांच्या ‘वेटिंग लिस्ट’मध्ये जयंत पाटीलही… धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट
फलकावरच राजकारण्यांनी अकारण गावात येऊन अपमान करून घेऊ नये, अशी तंबीच ग्रामस्थांनी दिली आहे. अशी बंदी करणारे राहेरी हे पहिले गाव ठरले असून हे गाव आणि ग्रामस्थांची भूमिका आता चर्चेत आली आहे.याचे लोन जिल्ह्यातील अन्य गावातही पसरण्याची शक्यता आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक गावांमध्येही यामुळे आता नेत्यांना गावबंदी केली जाऊ शकते. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी गावामध्ये येऊ नये,’ असे प्रसारमाध्यमांशी बोलताना गावकऱ्यांनी सांगितले.