यवतमाळ : कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर बघू, ही प्रेक्षकांची मानसिकता झाली आहे. मात्र, आपला चित्रपट टिकवायचा असेल तर ही मानसिकता बदलावी लागेल व आपला सिनेमा आपल्यालाच मोठा करावा लागेल, असे रोखठोक मत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने मांडले. यवतमाळ येथे एका कार्यक्रमानिमित्त आली असता, प्राजक्ताने खास ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील महाराणी येसूबाईच्या भूमिकेमुळे करिअरच्या सुरुवातीलाच सर्वत्र ओळख मिळाली. अगदी दहावी झाल्याझाल्या या भूमिकेसाठी स्वतःला तयार करणे, भूमिकेच्या अनुषंगाने ऐतिहासिक संदर्भ जाणून घेत येसूबाईचे चरित्र समजून घेत ते पात्र भूमिकेत उतरविणे आणि या पात्राची गरज म्हणून युद्धकला, शस्त्रास्त्र चालविण्यास शिकणे हे सारेच आव्हानात्मक होते, असे प्राजक्ता म्हणाली.
हेही वाचा : Wardha Rain News: अखेर सुट्टी मिळाली…पण केवळ ‘याच’ तालुक्यांना…
ही भूमिका यशस्वी झाली आणि अभियांत्रिकीच्या शिक्षणासोबतच फिल्मी करिअर घडत गेले, असे तिने सांगितले. महाराणी येसूबाई ही भूमिका करून आज बरीच वर्ष झाली आहेत. मात्र, अजूनही प्रेक्षकांच्या मनात ती भूमिका, पात्र कायम आहे. ही बाब माझ्यासारख्या कलाकाराच्या कामाची पावती आहे, असे प्राजक्ता म्हणाली. कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे कलाकाराचे प्रथम कर्तव्य असते. तरीही या भूमिकेची छाप सांभाळूनच आजही भूमिका स्वीकारते, असे प्राजक्ताने सांगितले. सध्या चित्रपट क्षेत्रात भरपूर संधी आहेत. मला वेगवेगळ्या भूमिकांच्या ‘ऑर्फस’येत आहे. मात्र, सर्वच भूमिका मी स्वीकारत नाही.
हेही वाचा : Maharashtra Rain Update: येत्या २४ तासांत विदर्भासह कोकण, पश्चिम किनारपट्टी क्षेत्रात पावसाचा “रेड अलर्ट”
विविधांगी भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला यायला आवडते. मात्र ऐतिहासिक भूमिकांचा बाजच काही वेगळा असतो, त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिका साकारेल, असे अभिनेत्री प्राजक्ताने सांगितले. यावेळी शुभम पाटील आदी उपस्थित होते. दाक्षिणात्य चित्रपट हटके असतात. मात्र या चित्रपट सृष्टीलाही मराठी चित्रपटांची भूरळ पडली आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक, निर्माते गोविंद वराह यांनी ‘गुगल आई’ नावाचा वेगळा चित्रपट बनविला आहे. या चित्रपटात आपण मुख्य भूमिकेत असून येत्या २६ जुलै रोजी हा चित्रपट जगभर प्रदर्शित होत असल्याचे प्राजक्ताने सांगितले. दाक्षिणात्य चित्रपट खूप भव्यदिव्य असतात. या चित्रपट निर्मात्यांना मराठी भाषेची भुरळ पडली आहे. त्यामुळे ही मराठी कलाकारांसाठी चांगली बाब आहे. येणार्या काळात अनेक मोठी मंडळी नवनवीन प्रयोग करणार आहेत. त्यामुळे भविष्यात ‘साऊथ’ इंडस्ट्रीमधला मसाला आपल्या सिनेमातही दिसणार असल्याचे प्राजक्ता गायकवाड हिने सांगितले.