राग आला की आपसूकच तोंडात शिवी येते, मात्र सुसंस्कृत किंवा संस्कारी घरातील लोकांना इच्छा असूनही शिव्या उच्चारणे जरा अवघड जाते. मग अशांनी कसं व्यक्त व्हायचं? अशा आतून तापलेल्या पण व्यक्त न होऊ शकलेल्या लोकांसाठी एक अनोखी स्पर्धा २७ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.
हेही वाचा- किती ही असंवेदना… ‘मंगला’ची कूस उजाडूनही लाज कशी वाटत नाही ?
हो, ऐकायला जरा विचित्र वाटेल, मात्र त्यामागचा हेतू तेवढाच संस्कार रुजविणारा आहे. शिव्या ते ओव्या अशा लेखनाची स्पर्धाच लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयाच्या मराठी विभागाने घेण्याचा निर्णय घेत वेगळेपणा जपला आहे. आता शिव्यांची स्पर्धा हा विषय जरा अनेकांना खटकणारा किंवा विचित्र वाटला असेल. पण त्यामागचा हेतूही तेवढाच प्रामाणिक आहे. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत लालबहादूर शास्त्री विद्यालय मराठी विभागाच्या प्रमुख स्मिता गालफाडे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा उदयास आली. ओव्या, भारुड, पोवाडे, कुसुमाग्रजांचे काव्य या गोष्टी आमचा अभिमान आहे. स्पर्धेच्या निमित्ताने लोकांच्या मनातील हे साहित्य कागदावर यावे, असा प्रयत्न असतानाच रंग, रूप, नाव, व्यंगत्व आणि अन्य गोष्टींवरून दिल्या जाणाऱ्या शिव्या खरंच प्रमाण भाषेत वापरण्याची गरज असते का? बोली भाषेतील या शिव्या मराठी समृद्ध आहे हे सांगताना शिव्या विरहित समाजाच्या आशेनी स्पर्धा घेतली जाणार आहे. ज्यावेळी वऱ्हाडी, झाडीपट्टी बोलींचा उल्लेख होतो, त्यावेळी त्या-त्या बोलीतील शिव्यांचा आवर्जून उल्लेख होतो, हे विशेष.
हेही वाचा- गोंदियातील बिरसी विमानतळ प्राधिकरणावर २.७ कोटींचा कर थकीत
शिव्या लिहायच्या म्हणजेच जरा अवघडच… ओव्यांचं ठीक आहे त्या सहज कागदावर उतरतील. पण शिव्यांचा काय. मग ज्या-ज्या व्यक्तींविषयी मनात प्रचंड चीड आहे, अशांना आठवा आणि शिव्या लिहून काढा. ५ मार्चपर्यंत ओव्या आणि शिव्यांचे संकलन लाल बहाद्दूर शास्त्रीच्या मराठी विभागात केले जाणार आहे. हा विषय इथेच थांबणार नाही तर संग्रहित झालेल्या शिव्यांचे कागद होलीका दहनाच्या दिवशी होळीत जाळून लोकांच्या मनातील कुटीलता किंवा एकमेकांबद्दलचा द्वेष संपविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि चांगल्या ओव्या लिहिणाऱ्यांना वाचस्पती पुरस्काराने गौरविले जाणार आहे. तर मग ओव्या तर लिहाच पण उघडपणे सहज दिल्या जाऊ न शकणाऱ्या शिव्याही लिहून काढा आणि द्या पाठवून… शिव्यांचे लिखाण करणाऱ्यांचे नाव गुपितच राहील, असे स्मिता गालफाडे यांनी सांगितले आहे.