नागपूर : दाक्षिणात्य चित्रपट तसेच बॉलीवूड प्रमाणे मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीचा विकास व्हावा यासाठी राज्य शासन याला उद्योगाचा दर्जा देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रदिनी याबाबत अधिकृत घोषणा करतील. बॉलिवूडप्रमाणे हजारोच्या संख्येत नवे रोजगारनिर्मिती करण्याची अपार क्षमता मराठी चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातही आहे. नाट्यक्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिल्यावर याला गती प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करत राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या समारोप प्रसंगी उदय सामंत बोलत होते.
रेशीमबाग परिसरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात मंचावर संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, मध्यवर्तीचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील, संजय रहाटे उपस्थित होते. मराठी भाषा केवळ दर्जा देऊन अभिजात ठरत नाही. नाट्यकर्मी, लेखक, दिग्दर्शक जे प्रयोग करतात ते अभिजातच असते. नाट्य व चित्रपटक्षेत्रातील कलावंत, तंत्रज्ञ यांना रोजगार व त्यांच्यासाठी कल्याणकारी उपक्रम राबवण्यासाठी नाट्यपरिषदेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामंत यांनी केले. येत्या काळात रंगभूमी गाजवणारे कलावंत आणि तंत्रज्ञ यांना प्रत्येकी पाच-पाच म्हणजे एकूण दहा घरे उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
संमेलन घेऊन जबाबदारी संपत नाही
समाराेपीय भाषणात सामंत यांनी परिषदेच्या अंतर्गत विसंवादावर बाेट ठेवत तीन वेळा संमेलनाची तारीख का बदलवण्यात आली हा प्रश्न उपस्थित केला. राजकीय पुढाऱ्यांमुळे तारखा बदलतात हे माहिती आहे पण आयाेजकांमुळेच तारखा बदलल्या हे पहिल्यांदाच पाहत असल्याचे सांगितले. तसेच केवळ नाट्य संमेलन घेऊन परिषदेची जबाबदारी संपत नाही. नाटकात काम करताना पडद्यावर आणि पडद्यामागे अनेक कलाकार परिश्रम करीत असतात. त्यांच्या आराेग्याची आणि सामाजिक हिताची काळजी घेत त्यांच्या प्रत्येक अडचणीत परिषदेने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज सामंत यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी मधू जोशी, प्रभाकर आंबोणे, श्रद्धा तेलंग, बापू चनाखेकर, शोभा जोगदेव, डॉ. रंजन दारव्हेकर, डॉ. विजय वैद्य, सुरेश घड्याळपाटील, प्रकाश एदलाबादकर, विजय जथे, संजय वलीवकर, वत्सला पोलकमवार, दयानंद चंदनवाले, मीना देशपांडे व सचिन कुंभारे या ज्येष्ठ कलावंतांचा उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘शतकोत्तर झाडीपट्टी रंगभूमी’ या रात्रकालीन कार्यक्रमाच्या माध्यमातून झाडीपट्टी रंगभूमीत १०० वर्षात झालेले बदल विविध नाटकांच्या रूपात सादर करण्यात आले. तंटाबिल्ला नाटकांपासून सुरुवात होऊन पौराणिक, ऐतिहासिक, लावणीप्रधान, सामाजिक प्रबोधनाच्या नाटकांची झलक यावेळी सादर करण्यात आली. ‘शतकीय संमेलनवारी’ या कार्यक्रमात शंभर नाट्य संमेलनाध्यक्षांचा इतिहास उलगडण्यात आला.