नागपूर : ‘तेरवं’ हा सिनेमा ८ मार्चला महिला दिनी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला. रसिकांनीही या चित्रपटाला चांगली दाद दिली. सिंगल स्क्रीनवर चित्रपट चांगले प्रदर्शन करीत असताना मल्टीप्लेक्समध्ये मात्र कमी तिकिटांची नोंदणी झाल्याचे सांगून चित्रपटाचे प्रदर्शन बंद करण्यात आले. हे मल्टीप्लेक्सचे धोरण मराठी विरोधी आहे, असा आरोप तेरंव चित्रपटाचे निर्माते नरेंद्र जिचकार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिचकार म्हणाले, ‘तेरवं’ चित्रपट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवांच्या संघर्षावर आधारित आहे. हा चित्रपट बंद करण्याचा उद्दामपणा मल्टीप्लेक्सने केला आहे. प्रेक्षक तेथे गेल्यावर सांगण्यात आले की, शो रद्द करण्यात आला आहे. कारण काय तर ऑनलाईन तिकीट बुक झाले नाही. संध्याकाळी साडेचारचा शो सकाळी १० वाजताच रद्द करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार दोघेही विदर्भाचे आहेत आणि विदर्भातील चित्रपटाला विदर्भातील मल्टीप्लेक्सवाले जागा देत नसतील तर विदर्भात हा व्यवसाय कसा उभा राहणार?

हेही वाचा…“भाजपविरोधी कोणत्याही आघाडीला समर्थन,” ॲड. सुरेश माने यांची माहिती; म्हणाले…

शासनाने निर्माते व मल्टीप्लेक्सधारकांची बैठक घेऊन एक तोडगा काढला पाहिजे, अशी मागणीही जिचकार यांनी केली. यावेळी चित्रपट दिग्दर्शक सलीम शेख, नितीन बन्सोड, चित्रपट महामंडळ नागपूरचे समन्वयक, एडीटर मिलिंद कुलकर्णी, संगीतकार वीरेंद्र लाटनकर, अभिनेत्री पूजा पिंपळकर, अभिनेता प्रशांत लिखार उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi film terav show cancelled in multiplex theatre despite single screen success producer narendra jichkar alleges bias rbt 74 psg