वर्धा : बरोबर ४० मिनिटे उशिरा आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन आनंददायी तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अनुपस्थिती आयोजकांवर नाराजीची लकेर उमटवणारी ठरली. मंत्री दीपक केसरकर, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर, आमदार डॉ. पंकज भोयर, सागर मेघे, नरेंद्र भोंडेकर, गिरीश गांधी, मावळते अध्यक्ष भारत सासणे, कार्यवाह प्रदीप दाते, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले  व अन्य मान्यवर प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर विराजमान झालेत. ना. गडकरी यांच्या कौटुंबिक स्नेह असलेल्या व्यक्तीचे निधन झाल्याने ते येऊ शकले नसल्याचे कळले. ‘लाभले आम्हांस भाग्य…’ हे कविवर्य सुरेश भट यांचे गीत व संमेलन गीत तसेच दीप प्रज्वलनाने साहित्य संमेलनाला आरंभ झाला.