महेश एलकुंचवार यांच्या हस्ते उद्घाटन, नाटय़कर्मी-रसिक दाखल
नागपूर : ९९व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या पहिल्या घंटेची उत्सुकता शिगेला पोहोचली असून सलग ६० तास चालणाऱ्या या संमेलनासाठी देशभरातून मराठी नाटय़ कलावंत आणि रसिक नागपुरात दाखल झाले आहेत. नाटय़ संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते आज, शुक्रवारी संध्याकाळी ६.३०ला होईल.
नागपुरात ३३ वर्षांनी नाटय़ संमेलन होत आहे. रेशीमबागेतील दिवंगत पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंचावर रंगणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, नाटय़ संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार, नाटय़ संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे, कार्याध्यक्ष गिरीश गांधी आदी मान्यवरही उपस्थित राहतील.
उद्घाटनापूर्वी शुक्रवारी दुपारी नाटय़ दिंडी काढण्यात येणार आहे. नाटय़ दिंडीत आजी-माजी अध्यक्षांसह परिषदेचे कार्यकारिणी सदस्य आणि कलावंत सहभागी होतील. दिंडीत नागपुरातील प्रसिद्ध मारबत, तंटय़ा आदी लोककलांचे सादरीकरण होईल.
संमेलनात ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे, संगीत नाटक अकादमीचा विशेष पुरस्कार विजेते नाटककार अभिराम भडकमकर, ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे आणि अन्य नाटय़कर्मीचा सत्कार करण्यात येणार आहे.