लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माजी संमेलनाध्यक्षांना सन्मानाने बोलावण्याचे संकेत आहेत. याआधीच्या संमेलनात हे संकेत अतिशय काटेकोरपणे पाळलेही गेले. परंतु, दिल्लीतील संमेलनात मात्र कोणत्याही माजी संमेलनाध्यक्षाला साहित्य महामंडळाकडून अधिकृत निमंत्रण गेलेेले नाही. त्यामुळे साहित्य महामंडळाला माजी संमेलनाध्यक्षांचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन तीन दिवसांवर आले तरी महामंडळाकडून माजी संमेलनाध्यक्षांना निमंत्रण गेलेले नाही. मागच्या काही संमेलनांचा विचार केल्यास उदगीरच्या संमेलनापर्यंत माजी संमेलनाध्यक्षांना निमंत्रित करण्यात येत होते. नंतर मात्र ही प्रथा थांबली. यावर्षीचे संमेलन दिल्लीत होत आहे.
देशाच्या राजधानीत मराठीचा गजर होणार असल्याने माजी संमेलनाध्यक्षांनी मराठीच्या प्रसारासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून त्यांना साहित्य महामंडळाने संमेलनाला निमंत्रित करणे अपेक्षित होते. परंतु, असे न घडल्याने साहित्य वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मला आयोजक संस्थेच्या प्रमुखांकडून संमेलनात उपस्थित राहण्याबाबत निमंत्रणाचे एक पत्र व्हॉट्सअपवर आले आहे. परंतु, ज्या संस्थेकडून हे संमेलन आयोजित केले जाते, त्या साहित्य महामंडळाकडून अधिकृत निमंत्रण मिळालेले नाही. – लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष, पुणे.
दिल्लीच्या संमेलनाला उपस्थित राहण्याबाबत मला साहित्य महामंडळाकडून अधिकृत निमंत्रण आलेले नाही. – भारत सासणे, माजी संमेलनाध्यक्ष, पुणे.
कवी संमेलन, मुलाखत, परिसंवाद, परिचर्चा…
● साहित्य संमेलनासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या संमेलनामध्ये कवी संमेलन, मुलाखत, परिसंवाद, परिचर्चा असे विविध कार्यक्रम होतील, अशी माहिती संमेलनाचे आयोजक ‘सरहद’ संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
● संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता विज्ञान भवनातील सोहळ्यात केले जाईल. या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.
● त्याचदिवशी सायंकाळी साडेसहा वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र होणार असून, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती असेल. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण, तर संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण या वेळी होईल.
● १९ फेब्रुवारीला पुणे येथून विशेष रेल्वे दिल्लीसाठी रवाना होईल. या रेल्वेमध्येही साहित्य संमेलन होणार आहे. या विशेष रेल्वेला महादजी शिंदे एक्स्प्रेस असे नाव देण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय रवींद्र सामंत असतील.