प्रमुख विदर्भवादी नेत्यांचा पाणी देण्यास पाठिंबा
एकीकडे एका जिल्ह्य़ातील पाणी दुसऱ्या जिल्ह्य़ात नेऊ देण्यास टोकाचा विरोध करणारी प्रवृत्ती असतानाच दुसरीकडे स्वत: गरजवंत असूनही तहानलेल्या मराठवाडय़ाला पाणी देण्यास वैदर्भीय नेते एकमताने मदतीचा हात पुढे करीत आहेत. ‘पहिले माणूस वाचवायला हवा, प्रादेशिक अस्मिता नंतर पाहू’, अशा प्रतिक्रिया या भागातील प्रमुख विदर्भवादी नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
मराठवाडय़ातील दुष्काळाचे आक्राळविक्राळ स्वरूप दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. पाणीच नसल्याने शेती, जनावरे आणि खुद्द माणसांचे जगणे या भागात अवघड झाले आहे. किमान पिण्यासाठी तरी पाणी मिळावे म्हणून मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील अनुक्रमे गोसीखुर्द आणि बेंबळा या दोन मोठय़ा प्रकल्पातील शिल्लक पाणी रेल्वेव्दारे मराठवाडय़ात नेण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भवादी नेत्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून सरकारला विरोध न करण्याची भूमिका मांडली. मराठवाडय़ातील माणूस व जनावरे जगवण्यासाठी पाणी देण्यास काहीच हरकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘मराठवाडय़ाला पाण्याची गरज आहे आणि विदर्भात ते शिल्लक आहे म्हणून देणे याला कोणाचाच विरोध असण्याचे कारण नाही, पण ही व्यवस्था तात्पुरती असावी, कायमस्वरूपी नको. कारण, विदर्भातील दोन धरणांमध्ये पाणी शिल्लक असण्यामागची कारणे सरकारच्या नाकर्तेपणात दडली आहेत. या भागालाही शेतीसाठी पाणी हवे आहे, पण पाटसऱ्याच बांधण्यात न आल्याने ते शेतापर्यंत पोहोचू शकले नाही. या गोष्टीकडेही सत्ताधाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
सोमेश्वर पुसदकर, उपाध्यक्ष, अनुशेष निर्मूलन व विकास समिती
‘मराठवाडा तहानलेला असल्याने मानवी दृष्टिकोनातून त्यांना मदत गरजेचीच आहे. यात प्रादेशिकवाद आणणे चुकीचे आहे, पण हे करताना विदर्भाकडे दुर्लक्ष नको. या भागातील धरणात पाणी कां शिल्लक राहिले, याचाही विचार होणे आवश्यक आहे.’
यशोमती ठाकूर आमदार, तिवसा
मराठवाडय़ात पाण्याचा प्रश्न गंभीर
‘मराठवाडय़ात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून, विदर्भातील गोसेखुर्द आणि बेंबळा प्रकल्पात पाणी शिल्लक आहे. ते देऊन त्यांची तहान भागविण्यास काहीच हरकत नाही. यामुळे विदर्भाचा काहीच तोटा होणार नाही.’ -अॅड. मधुकर किंमतकर, तज्ज्ञ सदस्य विदर्भ वैधानिक विकास मंडळ
माणसांचे जगणे महत्त्वाचे पाण्याचा प्रश्न गंभीर
‘प्रादेशिक अस्मितेपेक्षा माणसांचे जगणे महत्त्वाचे. मराठवाडय़ातील जनता पाण्यासाठी तहानलेली असताना आपल्याकडे साचून असलेले पाणी त्यांना देण्यात काहीच वाईट नाही. तेथे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचाही प्रश्न आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातही पाण्याची गरज आहे, पण त्याहीपेक्षा मराठवाडय़ाची गरज अधिक आहे. अशा वेळी मानवी दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो.’ वामनराव चटप, विदर्भ राज्य आंदोलन समिती