नागपूर : वढु तुळापूर येथे फाल्गुन वद्य अमावस्या ११ मार्च १६८९ रोजी क्रूर औरंगजेबाने संभाजी राजांची हत्या केली. त्या दुर्दैवी दिवसाला मंगळवारी ३३६ वर्ष पूर्ण होत आहे . इतक्या प्रदीर्घ काळानंतरही संभाजी नावाचे जबरदस्त आकर्षण समाजात असल्याचे अलीकडे प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाने दाखवून दिले. मात्र आजही शंभूराजे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार) आमदार व प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे.

अद्वितीय योद्धा

मिटकरी म्हणतात, शंभुराजांच्या जीवनचरित्राच्या समकालीन साधनांचा आधार घेत अभ्यास केला तर मराठा इतिहासात(छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता) त्यांच्या इतका साहसी,पराक्रमी, स्वातंत्र्यप्रेमी,स्वाभिमानी व सुसंस्कृत असा दुसरा छत्रपती झाला नाही. राजनितीशास्त्र, शृंगारशास्त्र, अध्यात्मशास्त्र आदींमध्ये पारंगत असलेल्या या वयाच्या अवघ्या तेराव्यावर्षी संस्कृतमध्ये “श्रीबुधभुषणम” (राजनीतीपर),”नखशिख” व “नायिकाभेद” हे ब्रजभाशेतील (शृंगार शास्त्रपर), ” सातसतक” (अध्यात्म शास्त्रापर) अशी ग्रंथरचना करून त्यांची सांस्कृतिक उंची व साहित्यातील योगदान स्वतःच अधोरेखीत केले. विद्वत्ते बरोबरच दुसरीकडे रणांगण गाजवताना सिद्दी, पोर्तुगीज,डच,इंग्रज व मुघलांशी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर विजयी झुंज देणारे ते अद्वितीय योद्धाही ठरले.

मराठी, हिब्रु, पाली, संस्कृत, इंग्रजी, ब्रजभाषेसह ते १७ भाषेचे जाणकार होते. कवी व तेज:पुंज शरीर संपदा मिळविलेले युवराजही होते. गोव्याचा व्हाईसरॉय ज्याचे सोबत १२०० गोरे, २५०० काळे शिपाई व ६ तोफा होत्या त्याला अवघ्या ६०० मराठ्यांनी फोंड्या किल्ल्यावरून पिटाळुन लावले, हे संभाजीराजांचे वेगळेपण होते! दिंडोरीतील रामसेज औरंगजेबाचा सरदार शहाबुद्दीन खानाविरुद्ध अनेक वर्ष मुठभर मावळ्यांनी लढवीला. शिवाय जंजिरा मोहीम, अकबराला राजाश्रय, दंडाराजपुरीवर चाल, भागानगरवर हल्ला, बुऱ्हाणपूर, कारंजा, जालना, औरंगाबाद, सुरत अशा असंख्य १४० लढाया लढून एकाही लढाईत पराभूत न होणारा विजयी योद्धा असा आपला छत्रपती, किती शुर आणि कर्तबगार असेल? वयाच्या ३२ व्या वर्षी ४० दिवस अन्नाचा कणही पोटात नसतांना सह्याद्रीचा हा छावा हाल सोसत स्वराज्य रक्षणासाठी समर्पित झाला.

‘राजसंन्यास ‘ मध्ये चुकीची प्रतिमा

चालु अर्थसंकल्पियअधिवेशन काळात मुंबईच्या शासकीय मुद्रणालयात मी काही पुस्तके चाळत असतांना माझ्या हाती “संपूर्ण गडकरी” हे शासनाने १९८१ साली प्रकाशित केलेले पुस्तक पडले.त्यात राजसंन्यास हे नाटक छापलेले होते. राजसंन्यासबद्दल आजवर ऐकले होते.मात्र केवळ तीनच पाने वाचल्यावर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली व कुणाचीही जाणार असेच लिखाण गडकर्‍यांनी केले होते. स्वराज्यासाठी एकीकडे कायस्थांनी दिलेले बलिदान, तर दुसरीकडे गडकरीने प्रकट केलेले त्यांचे वैचारिक दारिद्र्य या माध्यमातून वाचण्यात आले. गडकर्‍यांनी त्यांच्या राजसंन्यास नाटकात संभाजी राजांना रोमँटिक हिरोच बनविले होते. या विषयाचे गांभीर्य ओळखून मी तात्काळ ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषामंत्री उदय सामंत , उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार व एकनाथराव शिंदे यांच्या लक्षात पत्राद्वारे आणून दिली.

धर्मबदलाच्या प्रस्तावाबाबत…

राजसंन्यासच्या निमित्ताने मी आणखी इतिहासात शिरलो. त्याच दिवशी दुपारी विधान परिषदेच्या सभागृहात काही सदस्यांनी संभाजीराजांचा धर्म न बदलणारा राजा असा त्यांच्या सोयीचा उल्लेख केला होता. बादशाही छावणीत साकी मुस्तैदखान,व ईश्वरदास नागर हे दोघे संभाजीराजांच्या देहादंडाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्यांच्या ग्रंथात कुठेही संभाजीराजांना धर्म बदल असा प्रस्ताव औरंगजेबाने दिला नसल्याचे लिहिले आहे. रहुल्ला खानमार्फत बादशहाने दोनच प्रश्न विचारले होते, १)बुऱ्हाणपुर व इतर ठिकाणी लुटलेला खजिना कुठाय? आहे आणि बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवत होते?

संभाजी महाराजांची प्रतिमा चुकीची रंगवली

संभाजी राजांवर आजपर्यंत जेवढी नाटके चित्रपटे व कथानके रचली गेली तितकी इतिहासात दुसऱ्या कुणावरही रचली गेली नाहीत. साहित्यिकांच्या लेखणीत शंभुराजांची प्रतिमा स्वैर,दुर्वर्तनी व राज्यबुडव्या अशीच रेखाटल्या गेली हे महाराष्ट्राच्या साहित्याचे दुर्दैव म्हणावे लागेल! राजसंन्यास, राज मस्तकाचा आदेश, बेबंदशाही, रायगडाला जेव्हा जाग येते, थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, प्रणयी युवराज, सती गोदावरी, अश्रू ढळले रायगडाचे, दुर्दैवी छत्रपती, प्रतिज्ञा कंकण, अशी तब्बल ८० नाटकं,व ३२ चित्रपटे आजही युट्युब,विकिपीडिया व साहित्य क्षेत्रात जिवंत आहेत. ज्येष्ठ इतिहास संशोधक वा.सी. बेंद्रे, डॉ. कमल गोखले, जयसिंगराव पवार,यांसारख्या इतिहास संशोधकांनी संभाजी महाराजांच्या चरित्रावरील डाग पुसलेले आहेत. अनेक वर्षानंतर वढू तुळापूर येथील निबिड अरण्यात वा.सी. बेंद्रे यांनी तब्बल २२ वर्ष शोध घेऊन संभाजी राजांची समाधी शोधून त्यावर चौथरा बांधला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी समाधी स्थळाचा जीर्णोद्धारा करण्यासाठी पुढाकार घेतला.

महाराष्ट्र शासनाचे दुर्लक्ष

रोजी शंभूराजांच्या हौतात्म्याला ३३६ वर्ष पूर्ण झालीत. मात्र अद्यापही त्यांच्या उज्वल जीवनचरित्रावर महाराष्ट्र शासनाने प्रकाश टाकला नाही. विधिमंडळ परिसर व मंत्रालयात त्यांचे तैलचित्र लावण्याचाही प्रयत्न झाला नाही. शासकीय मुद्रणालयात त्यांचे अधिकृत चित्र उपलब्ध नाही. यावेळी तरी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करून इतिहास संशोधकांच्या देखरेखित चरित्र साधन समिती गठित करावी ,अशी महाराष्ट्रातील मराठी मनाची जनभावना आहे. सोबतच बलिदान दिनी त्यांना अभिवादन करावे, त्यांचा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये अंतर्भूत करावा. छावा अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत झुंजत आहे.. चित्रपट बघून मनोरंजन होऊ शकेल मात्र देशातील या थोर छत्रपतींचा पराक्रम सानथोरांनी पाठ्यपुस्तकातून आत्मसात केला व सरकारने तसा तो अंत:र्भूत केला तरच हे सूयोग्य काम सरकार कडून घडेल छत्रपती संभाजी महाराज उपेक्षित राहू नयेत ही महाराष्ट्राची अपेक्षा आहे,असे मिटकरी यांनी नमूद केले आहे.

Story img Loader